ठाणे, पालघरमध्ये २४४ बेकायदा शाळा

ठाणे, पालघरमध्ये २४४ बेकायदा शाळा

शाळेतील मुले

बेकायदा शाळांची यादी दरवर्षी जाहीर केली जात असली तरी झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या ठाणे, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळा सुरू केल्या जात आहेत. पालघरमध्ये यावर्षी तब्बल 197, तर ठाण्यामध्ये 47 अशा 244 बेकायदा प्राथमिक शाळा बिनदिक्तपणे सुरू आहेत. फौजदारी कारवाईसह एक लाख दंडाची कायद्यात तरतूद असतानाही बेकायदा शाळा चालवणारे सर्रास नियम धाब्यावर बसवत आहेत.

ठाणे व पालघरचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे विविध ठिकाणांहून नागरीक मोठ्या संख्येने येथे राहण्यास जात आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे व पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा शाळांचे पेव फुटले आहे. प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. मात्र खासगी शाळा सुरू करणार्‍यांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सर्रासपणे शाळा उघडण्यात येत आहेत. प्राथमिक शाळांच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल 197 बेकायदा शाळा सुरू आहेत. गतवर्षी हाच आकडा 234 इतका होता. यंदा शिक्षण संचालनालयाकडून पाठवलेल्या कारवाईच्या नोटीशीमुळे यात घट झाली आहे.

पालघरमध्ये बेकायदा शाळांच्या आकड्यात घट झाली असली तरी ठाण्यामध्ये मात्र यात वाढ झाली आहे. ठाण्यामध्ये गतवर्षी 38 बेकायदा शाळा होत्या. त्यात वाढ होऊन 47 शाळा झाल्या आहेत. त्यामुळे ठाणे, पालघरमधील 244 शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. शिक्षण संचालनालयाकडून दरवर्षी बेकायदा शाळांची यादी जाहीर करून त्यांना नोटीस देण्यात येते. तसेच या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये अशा सूचना पालकांना देण्यात येतात.

बेकायदा शाळांना एक लाख रुपये दंड
बेकायदा शाळा बंद न केल्यास एक लाख इतका दंड वसूल केला जाणार आहे. त्यातूनही शाळा सुरु ठेवल्यास प्रतिदिन 10 हजारांचा दंड आकारला जाईल, अशी नोटीस शाळांना पाठवण्यात आली आहे. माध्यमिक शाळांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. हा आकडा आल्यास बेकायदा शाळांची संख्या आणखी वाढेल.

First Published on: November 13, 2018 5:34 AM
Exit mobile version