विधानसभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून राष्ट्रवादीचे २५ जण इच्छुक

विधानसभेसाठी कल्याण-डोंबिवलीतून राष्ट्रवादीचे २५ जण इच्छुक

राष्ट्रवादी तगड्या उमेदवाराच्या शोधात

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले असून, कल्याण जिल्हयांतर्गत चार विधानसभा मतदार संघासाठी तब्बल २५ इच्छुकांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर केले आहेत. त्यात दिग्गजांचाही समावेश आहे.

चार मतदारसंघांसाठी २५ अर्ज

कल्याण जिल्हयांतर्गत डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. सध्या चारही मतदार संघात शिवसेना भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, कल्याण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले नगरसेवक बाबाजी पाटील, अर्जुनबुवा चौधरी तसेच कल्याण जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सुधीर पाटील हे इच्छुक आहेत.

४ उमेदवार निवडण्याचे पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, अॅड. प्रल्हाद भिलारे, सुभाष गायकवाड, संदीप देसाई आणि वसंत पाटील यांच्यासह ८ ते ९ इच्छुकांनी तिकिटाची मागणी केली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघासाठी वर्षा कळके, रमेश साळवे, जानू वाघमारे, काशिनाथ पाटील आणि अश्विनी धुमाळ यांनी उमेदवारी मागितली आहे. काही कार्यकर्ते कल्याण पूर्वमधून आमदार डॉ. जगन्नाथ शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. डोंबिवली मतदारसंघातून सुरेंद्र म्हात्रे आणि युवराज पवार यांनी उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे पक्षाकडून काय निर्णय घेतला जातोय? याकडे पक्षातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

First Published on: July 12, 2019 8:08 PM
Exit mobile version