२२ वर्षानंतरही शौर्य पदकाची प्रतीक्षा

२२ वर्षानंतरही शौर्य पदकाची प्रतीक्षा

प्रभाकर भोगले

मुंबई पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अनेक पोलिसांचा विविध शौर्य पदक, पुरस्कार करून सन्मान केला जातो. दंगलींच्या काळात अनेकांचे प्राण वाचवणारे, दंगल काळात बचावाची चांगली कामगिरी केल्याप्रकरणी गौरवण्यात आलेल्या एका पोलीस अधिकार्‍याला सेवानिवृत्तीनंतरही शौर्य पदकापासून वंचित राहावे लागले आहे. सेवानिवृत्ती होऊन अडीच वर्षे उलटल्यावरही या शौर्य पदकासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आता तरी संबंधित यंत्रणा दखल घेऊन पदकाचा मान देतील, असा विश्वास प्रभाकर भोगले या माजी पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

वर्ष १९७८ साली प्रभाकर भोगले मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले होते. १९८४ ची दंगल असो किंवा १९९३ साली झालेल्या दंगलीदरम्यान त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले होते. १९९६ साली गोरेगावच्या पाववाला चौक परिसरातल्या ‘पुजा बार’चे मालक किशोर अडवाणी यांच्यावर दोन जणांनी गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणात धाडसी कामगिरी त्यांनी बजावली. या उल्लेखनीय कामागिरीबद्दल त्यांना विशेष शौर्य पदक जाहीर केले होते. पाच हजार रुपये रोख रक्कम, शौर्यपदक आणि प्रमाणपत्राचा या सन्मानात समावेश होता. पण या रकमेपैकी त्यांना आजपर्यंत फक्त ३ हजार ८०० रुपये देण्यात आले. मात्र पदक आणि प्रमाणपत्र तसेच उर्वरित रक्कम त्यांना अद्याप मिळालेली नाही. पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले प्रभाकर भोगले आजही या सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत.

१९९६ साली गोरेगावच्या पाववाला चौक परिसरातल्या ‘पुजा बार’ चे मालक किशोर अडवाणी यांच्यावर दोन जणांनी गोळीबार केला. त्यावेळी रात्रपाळीस असणारे प्रभाकर भोगले यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने या दोनही आरोपींना धाडसाने पकडले होते. जोगिंदर उर्फ जॉनी कनोजीया आणि फिरोज अहमद शेख उर्फ मुन्ना अशी या दोन आरोपींची नावे होती. या दोघांच्या मुसक्या आवळल्यावर भोगले यांनी तातडीने जखमी झालेल्या किशोर अडवाणी यांना रुग्णालयात दाखल केले होते. राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे त्या वेळी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वतः भोगले यांचे कौतूक करून विशेष शौर्य पदकासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आणि भरभरुन कौतुकसुद्धा केले.

पोलीस दलातील सेवेत असताना १९८४ साली मुंबईतल्या परळमधल्या भोईवाडा परिसरात झालेल्या धर्मिक दंगलीदरम्यान एका दर्ग्यातून प्रभाकर भोगले यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना सुखरुप बाहेर काढले होते. त्यानंतर १९९३ साली काळाचौकी विभागात झालेल्या दंगलीमध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री बबनराव पाचपुते हे या ठिकाणी आले होते. त्यावेळी एक जमाव हिंसक झाला. या जमावातून पाचपुते यांना सुखरुप बाहेर काढण्यात भोगले यांना यश आले. या कर्तव्यावर त्यांनी पुन्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी बजावली. या कारवाईत त्यांच्या हातात बंदुकीची गोळीसुद्धा घुसली होती. पण या धाडस आणि शौर्यासाठीही त्यांना फक्त शाबासकीवर समाधान मानावे लागले.

विशेष शौर्य पदक सन्मानातल्या पाच हजार रकमेपैकी त्यावेळी त्यांना ३ हजार ८६८ रुपये देण्यात आले. मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी असलेल्या तत्कालिन आयुक्त रामदेव त्यागी यांनी त्यांच्या विशेष शौर्य पदकाच्या प्रस्तावावर सही करून त्याला मंजुरीही दिली होती. मात्र यानंतरसुद्धा अनेक वर्षे पदक आणि सन्मानपत्र मिळत नसल्याने भोगले यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा आजही सुरू ठेवला आहे. काही वर्षांनंतर परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्तपदी असणारे दत्ता पडसलगीकर अलिकडच्या काळात मुंबईच्या आयुक्तपदी आले. त्यावेळीही भोगले यांनी पदक सन्माबाबत पाठपुरावा केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे कर्तव्यावर असताना आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणारे प्रभाकर भोगले हे पोलीस विभागातील लालफितीच्या कारभारामुळे मागील २२ वर्षांपासून सन्मानापासून उपेक्षित राहिले आहेत.

पाठपुरावा करूनही पदरी उपेक्षा
२२ वर्षांपासून मी शौर्य पदकाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर साहेब यांनाही भेटलो. त्यांनी कार्यालयातील क्लार्क आणि प्रशासकीय अधिकारी यांना बोलवून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. मात्र साहेबांचे आदेश कागदावरच राहिले. आता मी न्याय कोणाकडे मागू? मंत्रालयातील गृहविभाग, आयुक्त कार्यालय यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा करूनही माझ्या पदरी उपेक्षाच आली आहे. -प्रभाकर भोगले,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक

भोगलेंच्या पदकासाठी विशेष लक्ष देईन
प्रभाकर भोगले हे कार्यक्षम पोलीस अधिकारी असून मी झोन-२चा उपायुक्त
असतेवेळी त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल मी त्यांची शौर्यपदकासाठी शिफारस केली होती. तसा प्रस्ताव तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. अजूनही जर त्यांना शौर्यपदक मिळाले नसेल तर मी स्वतः यात जातीने लक्ष घालेन.
-दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालक.

First Published on: December 23, 2018 6:58 AM
Exit mobile version