तंबाखू विरोधात राज्यातील २६ लाख विद्यार्थी राबवणार मोहिम

तंबाखू विरोधात राज्यातील २६ लाख विद्यार्थी राबवणार मोहिम

(फोटो प्रातिनिधिक आहे)

तंबाखूच्या सेवनामुळे जगात सर्वात जास्त मृत्यू होतात. याविषयी वारंवार जनजागृती करुनही लोक तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात. आता लहान मुलं ही सिगारेट, गुटखा, तंबाखूचं व्यसन करताना आढळतात. याच पार्श्वभूमीवर तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची समाजात जनजागृती करण्यासाठी ‘प्लेज फॉर लाईफ’ हे राष्ट्रीय अभियान राबवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे. राज्यातील जवळपास २६ लाख विद्यार्थी या तंबाखू विरोधी मोहिमेत सहभागी झाले आहेत. तसेच, सर्व शाळांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.

महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ५३० मुले तंबाखूच्या आहारी

ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ ( गेट्स ) च्या अहवालानुसार, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जवळपास अडीज कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यात २ कोटी लोक तोंडावाटे तंबाखू सेवन करणारे तर, ४० लाख धूम्रपान करणारे आहेत. त्यांच्या व्यसनाचा परिणाम व्यसनकर्त्यांप्रमाणे निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावर देखील होत आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ४५ हजार मृत्यू

केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारात महाराष्ट्रातील ४५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. शाळेत जाणाऱ्या आठवी, नववी आणि दहावीच्या एकूण ४ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असते. त्याहीपेक्षा गंभीरबाब म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची सुरुवात करीत असल्याचे सर्वेक्षणानुसार समोर आले आहे.

‘प्लेज फॉर लाईफ’ मोहिमेची सुरुवात

शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन तर्फे ‘प्लेज फॉर लाईफ’ हे राष्ट्रीय अभियान राबवले जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी माहितीपट दाखवून तंबाखू शरीरासाठी किती घातक आहे? याबाबतची माहिती दिली जात आहे. यासोबत तंबाखू विरोधी सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. आपली शाळा आणि समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.

८ जिल्ह्यांमधील २६ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

या अभियानाच्या माध्यमातून तंबाखूचा वापर आणि व्यसनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम कमी करण्यासाठी शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत त्यांची एक साखळी निर्माण केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभाग, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० क्लब आणि संबंध हेल्थ फाऊंडेशनच्या मदतीने ‘प्लेज फॉर लाईफ’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत जवळपास ८ जिल्ह्यांमधील २५ हजार शाळांमधील २६ लाख विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली. त्यात जळगावातील ८ लाख ५१ हजार ९४७, अकोलामध्ये २ लाख ३७ हजार, अमरावतीत ३ लाख ८० हजार, नागपूरमध्ये २ लाख ४ हजार, चंद्रपूरात १ लाख ९७ हजार १९२, बुलढाणात १ लाख ४० हजार २७५ आणि वर्ध्यात ७६ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

महागड्या वैद्यकीय उपचारांपेक्षा तंबाखू विरोधी जागृती उपक्रमांनी कॅन्सरवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.  – डॉ. गोविंद मंत्री, विओटीवी पेट्रन मुखकर्करोग तज्ञ

विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसन विळख्यात सापडू नयेत त्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षकांसोबत नेहमी कार्यरत असणार आहे.  – दीपक छिबा, हेल्थ फाऊंडेशन संस्थेचे महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख

First Published on: September 11, 2018 2:39 PM
Exit mobile version