ट्रामा केअर रुग्णालयातील तीन परिचारिका निलंबित

ट्रामा केअर रुग्णालयातील तीन परिचारिका निलंबित

प्रातिनिधिक फोटो

जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात मोतिबिंदूची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरून रुग्णांना दृष्टी गमावण्याची वेळ आल्याने ३ परिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय रजिस्टार, गृह अधिकारी,ड्रेसर, बहुउद्देशीय कामगार यांच्यावरही ठपका ठेवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

काय आहे प्रकरण

जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात २५ जानेवारीला सात रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासर्वांना संसर्ग झाल्याने त्यांना दृष्टी गमावण्याची वेळ आली होती. परंतु त्यापैकी ४ रुग्णांची दृष्टी परत आली असून उर्वरीत ३ रुग्णांची दृष्टी कायमचीच गेली आहे. या घटनेनंतर रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.बावा यांना पदावनत करण्यात आले होते. याप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले होते. तसेच सभागृहात सत्ताधारी पक्षांनीही याचा निषेध व्यक्त करत चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. या चौकशीचा अहवाल अखेर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात आयुक्तांनी कर्मचार्‍यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत प्रभारी सिस्टर विना क्षिरसागर, स्टाफ नर्स समृध्दी साळुंके, दिप्ती खेडेकर यांना तात्काळ निलंबित करून त्यांची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई

याशिवाय रजिस्टार डॉ. मोहम्मद साबीर, गृह अधिकारी डॉ. कुशल कचा, ड्रेसर अशोक कांबळे, कामगार हितेश कुंडईकर आदींवरही ठपका ठेवत त्यांचीही सर्वंकष चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. अरूण चौधरी हे मानद सेवा देत असून इतर सार्वजनिक रुग्णालयांतही ते सेवा देत असतात. त्यामुळे त्यांची चौकशी होईपर्यंत त्यांना कुठल्याही सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सेवा देता येणार नाही,असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य परिषदेला सुचना देवून त्यांची नोंदणीही रद्द करण्याची कारवाई केली जावी, असेही म्हटले आहे. डॉ. बावा यांची चौकशी करण्यात येत असल्याने तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात येवू नये. कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता गणेश शिंदे यांच्याही चौकशीचे आदेश दिले आहेत. शस्त्रक्रियांगारासाठी एसओपी निश्चित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

First Published on: February 14, 2019 10:10 PM
Exit mobile version