कोरोनाच्या काळात महापालिकेच्या ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कोरोनाच्या काळात महापालिकेच्या ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मार्च महिन्यापासून कोरोना कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग झाल्यापासून मुंबई महापालिकेच्या सुमारे १६५० आसपास विविध विभागांमधील अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या कोरोनाच्या कालावधीत महापालिकेच्या ३९ कामगार, कर्मचारी तथा अधिकारी यांचे मृत्यू झाले आहेत. परंतु यातील मृत्यू प्रमाणपत्रांच्या निष्कर्षानुसार केवळ ६ कर्मचाऱ्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र तपासून त्यातील मृत्यूच्या कारणाच्या आधारे प्रत्यक्षात कोरोनामुळे किती कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन करत आहे.

कोरोना कोविड-१९च्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन विभागांसह बिगर आपत्कालिन विभागांमधील कर्मचारी कार्यरत आहे. मात्र, या उपाययोजना करताना, अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. महापालिकेचे अनेक कर्मचारी हे वसई विरारपर्यंत तर  बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, नवी मुंबई, पनवेल येथून कामाला येतात. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांच्या कामांमध्ये भाग घेताना त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अनेक स्थानिक महापालिका व नगरपालिकांनी या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी, अशी भूमिका घेतली होती.

अत्यावश्यक सेवेतील काही डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आयाबाई, तसेच रुग्णालयातील इतर कामगार, सुरक्षा विभागाचे जवान, मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन, करनिर्धारण व संकलन, नगर अभियंता विभाग आदी ६० टक्क्यांहून अधिक कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील असून उर्वरीत कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केल्याने बिगर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही सेवेत आहेत. त्यामुळे यासर्व विभागांमधील सुमारे १६५०च्या आसपास विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ  अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सर्व विभागांकडून यासंदर्भात मगवलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली असली तरी ज्याप्रमाणे कर्मचारी विभागाकडे ज्याप्रमाणे नोंद करेल, त्याप्रमाणे सुधारीत आकडेवारी विभाग सामान्य प्रशासनाकडे प्राप्त होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये महापालिका मुख्यालयातील आपत्कालिन विभागातील १४ कर्मचाऱ्यांचा तर सुरक्षा विभागातील १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत सुरक्षा विभागाचे ८५च्या आसपास कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

मार्चपासून सुरु झालेल्या या कोरोनाच्या कालावधीत ३९ विविध खात्यांमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांचे वार्षिक मृत्यू होतात. त्यातुलनेत मृतांची आकडेवारी नियंत्रणात आहे. परंतु या ३९ पैकी केवळ सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सहा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी सादर केलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उर्वरीतांपैकी किती जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत आणि कोणाचे मृत्यू नैसर्गिक झाले आहे, याचा निष्कर्ष हा मृत्यू प्रमाणपत्रावरील मृत्यूच्या कारणामुळे स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जी-उत्तर विभागातील करनिर्धारण व संकलन विभागाचे निरिक्षकाचा पहिला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आतापर्यंत कोरेानामुळे मृत्यू झालेल्या अधिकृत आणि समोर आलेली आकडेवारी १३ एवढी आहे. घनकचरा विभागाचे मुकादम, शताब्दी रुग्णालयातील कर्मचारी, वीजतंत्री, इमारत प्रस्ताव विभागाच्या शिपाई, जीटीबी रुग्णाचे कक्ष सहायक, केईएम रुगणलयाचे मुख्य सुरक्षा रक्षक, कामाठीपुरा चौकीचे कामगार, भाभा रुग्णालयातील नळकारागिर, निवडणूक विभागातील अधिकारी, तसेच गोरेगाव व विलेपार्ले येथील मुंबई अग्निशमन दलाचे जवान अशाप्रकारे १३ जणांची अधिकृत माहिती समोर आली असली तरी मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र महापालिकेला सादर केल्यास त्यातील किती कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला याची अधिकृत आकडेवारी समोर येईल.

मुंबई अग्निशमन दलाच्या आणखी एका जवानाचा मृत्यू

गोरेगाव येथील अग्निशमन केंद्रातील यंत्र चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाच आता मुंबई अग्निशमन दलाला आणखी एक धक्का बसला आहे. विलेपार्ले येथील केंद्रातील आणखी एका यंत्रचालकाचा कोरोनामुळे मृत्यू  झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अग्निशमन दलातील जवानांची संख्या ४वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ४१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

First Published on: May 29, 2020 8:12 PM
Exit mobile version