माहीम येथे 40 वर्षांच्या अज्ञात व्यक्तीची हत्या

माहीम येथे 40 वर्षांच्या अज्ञात व्यक्तीची हत्या

प्रातिनिधिक फोटो

मुंबई: – माहीम येथे एका 40 वर्षांच्या व्यक्तीची अज्ञात मारेकर्‍याने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून तो भिकारी असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले.

ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा ते पाऊणच्या सुमारास माहीम येथील डॉ. रायकर मार्गावरील अमृत लेबोरीटी दुकानासमोर घडली. या दुकानासमोर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती रात्री एका दक्ष नागरिकाने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली होती. ही माहिती प्राप्त होताच माहीम पोलिसांच्या विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात ही व्यक्ती भिकारी असून दर्गा परिसरात भीक मागताना त्याला काहींनी पाहिले होते. त्याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू त्याच्याकडे सापडली नाही, त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केला आहे. या हत्येमागे गुर्दुल्ले मारेकर्‍याचा सहभाग असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मारेकर्‍याचा शोध सुरु केल्याचे वरिष्ठ पोलीस कैलास चव्हाण यांनी सांगितले.

First Published on: October 10, 2018 1:02 AM
Exit mobile version