डोंबिवलीत एमएमआरडीएचे 450 कोटींचे रस्ते

डोंबिवलीत एमएमआरडीएचे 450 कोटींचे रस्ते

एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत 450 कोटींचे रस्ते उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये काही प्रमुख तर काही अंतर्गत असे मिळून 34 रस्त्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीला मान्यता दिली असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या 34 रस्त्यांपैकी 4 रस्त्यांचा खर्च हा 5 कोटींच्या आतमध्ये असल्याने त्याचे काम कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत केले जाणार आहे. तर उर्वरित 456 कोटी रुपये खर्चाचे 30 रस्ते एमएमआरडीए प्रशासन बनवणार आहे. त्यातही 6 रस्ते डोंबिवली पश्चिमेतील तर उर्वरित 24 रस्ते डोंबिवली पूर्वेतील आहेत. येणार्‍या काळात डोंबिवलीकरांना थोडा त्रास सहन करावा लागेल मात्र त्यानंतर सर्व रस्ते चांगले झालेले असतील असा विश्वासही राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

महापालिकेवर राज्यमंत्र्यांचा हल्लाबोल
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनातील अधिकारी वर्ग अत्यंत ढिम्मपणे काम करत असून त्यामुळे शहरांच्या विकासाला खीळ बसल्याचा हल्लाबोल राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केला. लोकप्रतिनिधीनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या कामांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक नागरी प्रश्न निर्माण झाले असून याला प्रशासन प्रमूख म्हणून आयुक्त आणि त्यांचे अधिकारी जबाबदार असल्याची टिकाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली.

First Published on: August 31, 2019 1:25 AM
Exit mobile version