महापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार

महापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार

मुंबईत दररोज एक हजारच्यावर करोना रुग्ण सापडत आहेत. करोना रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी दिवस-रात्र काम करत असल्याने आतापर्यंत १५००हून अधिक कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. शिवाय ३५ हून अधिक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. या माझ्या योद्ध्यांना राज्य सरकारने ज्याप्रमाणे मृत पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख दिले आहेत, त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना ५० लाख मिळवून देण्याचे आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहे.

‘आपलं महानगर’ शी बोलताना त्यांनी महापालिकेचे ६० टक्केहून अधिक कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात, मात्र रुग्णांच्या सेवेसाठी असणारे आणि करोनाचा संसर्ग झालेले ९५० हून अधिक कर्मचारी बरे झाले असल्याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. मात्र ३५ हून अधिक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची खंत निश्चितच मला आहे, असं ते म्हणाले.

मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत देण्यात येईलच; पण त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या ६० टक्के अत्यावश्यक कर्मचार्‍यांमध्ये सफाई कर्मचारी, सुरक्षा विभाग, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आपत्कालीन कक्ष, अग्निशमन दल आणि आरोग्य खात्यातील कर्मचारी येतात. मुंबई महापालिकेतील कर्मचारी हे अंबरनाथ, बदलापूर, वाशी, विरार आणि थेट पनवेलवरून कामासाठी येत असतात. आपला जीव धोक्यात घालून करोना रुग्णांच्या सेवेसाठी ते येत असल्यामुळे काही अघटित झाल्यास त्यांना ५० लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आयुक्तांनी यावेळी बोलताना सांगितले.

First Published on: May 29, 2020 11:55 PM
Exit mobile version