नवी मुंबईतून ५० गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

नवी मुंबईतून ५० गुन्हेगार  दोन वर्षांसाठी तडीपार

घरफोडी, मारामारी, विनयभंग, गर्दी, चोरी, दरोडा, जुगार, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गुन्हे दाखल असलेल्या तब्बल ५० गुन्हेगारांना आतापर्यंत परिमंडळ १ हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात २१ जणांना तडीपार करण्यात आल्याने हा आकडा ५० वर पोहचला आहे. या गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ तसेच ५७ नुसार कारवाई करून त्यांना मुंबई उपनगरे, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी आणखी २१ गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली.त्यामुळे परिमंडळ -१ च्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या ५० वर पोहोचली आहे. सणउत्सव काळात सराईत गुन्हेगार व शिक्षा झालेल्या सराईत गुन्हेगारांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने शहरातील गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी कारवायांवर वचक बसावा, यासाठी परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी आपल्या हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचाली तपासून त्यांच्यावर गुप्त पाळत ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दहा पोलिस ठाण्यांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, शिक्षा झालेले व सातत्याने गुन्हे दाखल होणार्‍या २९ गुन्हेगारांची यादी तयार करून गणेशोत्सवादरम्यान त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५६ व ५७ नुसार तडीपारीची कारवाई केली.

या गुन्हेगारांना मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर नवरात्रीदरम्यान आणखी २१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली. तडीपार करण्यात आलेल्या या गुन्हेगांरावर घरफोडी, मारामारी, विनयभंग, गर्दी, चोरी, दरोडा, जुगार, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांवर वेळीच कारवाई केल्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवादरम्यान निश्चितच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसला. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सार्वजनिक शांतता टिकून राहण्यास मोठी मदत झाल्याचे परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. दरम्यान, हे गुन्हेगार मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत आढळून आल्यास त्यांची माहिती तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्याला देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर नवी मुंबई पोलिसांची करडी नजर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधक कारवाईचे सत्र सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

कारवाईची आकडेवारी

तडीपार करण्यात आलेल्या कारवाईत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील-८, रबाळे एमआयडीसी-६, रबाळे, नेरूळ आणि एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी-२ तर सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अशा एकूण २१ गुन्हेगारांचा समावेश आहे. यातील ९ गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे, तर १२ गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५७ नुसार तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

First Published on: November 26, 2018 5:59 AM
Exit mobile version