आरटीईसाठी मुंबईत ६ हजार ४८१ जागा

आरटीईसाठी मुंबईत ६ हजार ४८१ जागा

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश फेरीला १७ फेब्रुवारीला सुरूवात झाली. राज्यातील मुंबई, अहमदनगर, जळगाव, गोंदिया आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरु झाली. आरटीई २५ टक्के प्रवेशांतर्गत यंदा मुंबई विभागात ३४३ शाळांमध्ये ६ हजार ४८१ जागा उपलब्ध आहेत.

तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असून, पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना पालकांनी कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. प्रवेश प्रक्रियेत पालकांना काही अडचण आल्यास त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ५३ मार्गदर्शक मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मदत केंद्राची ही यादी संकेतस्थळावरील हेल्प डेस्क या पर्यायावर क्लिक केल्यास उपलब्ध होणार आहे. पालकांना ऑनलाईन तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. तसेच ज्या मुलांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

First Published on: February 17, 2022 9:50 PM
Exit mobile version