धूम्रपान करणाऱ्यांपैकी ६१ टक्के लोकांचा चाळीशीत मृत्यू

धूम्रपान करणाऱ्यांपैकी ६१ टक्के लोकांचा चाळीशीत मृत्यू

धूम्रपान शरिरासाठी हानीकारक आहे (प्रातिनिधिक चित्र)

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात तब्बल १२० दशलक्ष लोकं धूम्रपान करतात. जगातील एकूण धूम्रपान करणाऱ्यांपैकी भारतीयांचे हे प्रमाण तब्बल १२ टक्के आहे. भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे एक दशलक्षहूनही अधिक लोकं मृत्यूमुखी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जे पुरूष तसेच महिला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात त्यातील ६१% लोकं ३० ते ६९ या वयात मृत्यूमुखी पडतात. इतरांमध्ये म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ३९ टक्के एवढे कमी आहे. भारतात साधारणत: २६ टक्के प्रौढ हे तंबाखूचे सेवन करतात. तर त्यात ३३ टक्के पुरुष आणि १८.४ टक्के महिलांचा समावेश आहे.

तंबाखू नियंत्रण केंद्रांची स्थापना

गेल्या काही वर्षांमध्ये या प्रमाणात घट झाली आहे. इंडीयन डेंटल असोसिएशन (आयडीए) सारख्या संघटनांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. आयडीएने तंबाखूमुक्त भारत हे ध्येय बाळगत तंबाखू खाणाऱ्यांनी, चघळणाऱ्यांनी आणि धूम्रपान करणाऱ्यांनी आपल्या या सवयी सोडून द्याव्यात हा त्यामागील हेतू असतो. या गोष्टी साध्य करण्यासाठी व्यसनाधीन व्यक्तींचे समुपदेशन आणि त्यासाठी औषधिय उपाय योजण्याकडे संस्थेचा कल असतो. आयडीएने त्यासाठी तंबाखू नियंत्रण आणि प्रतिबंध मध्यस्थी उपक्रम (टीसीसीआयआय अर्थात Tobacco Control & Cessation Intervention Initiative) केंद्रे उभारली आहेत. ही केंद्रे तंबाखूविरोधी उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

राज्यभर टीसीसीआयआय केंद्र

टीसीसीआयआय केंद्रे ही भारतात अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यात आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. ही केंद्र म्हणजे प्रमाणित दवाखाने असून ती तंबाखूविरोधी मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावतात. ही केंद्र नागरिकांना तंबाखूच्या सवयी सोडून देण्यात आणि लोकांमध्ये तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती आणण्यामध्ये आणि तंबाखू सेवनांपासून होणारे मृत्यू रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. टीसीसीआयआय केंद्रांचा मूळ हेतू हे देशाला तंबाखूच्या विळख्यातून मुक्त करणे हा आहे. तसेच तंबाखूच्या सेवनातून मृत्यूमुखी पडणाऱ्या लाखो लोकांचे जीव वाचवणं हे आहे. त्यातून देशातील मौखिक आरोग्याच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल.

भारतातील ५० टक्के कर्करोग हे तंबाखूमुळे होतात. त्यातील ९० टक्के हे मौखिक कर्करोग असतात. त्यातही भयानक गोष्ट म्हणजे मौखिक कर्करोगाचे निदान झालेले तब्बल ५० टक्के रुग्ण हे निदान झाल्यापासून १२ महिन्यांच्या आत मरण पावतात
– डॉ. पंकज चतुर्वेदी, प्राध्यापक आणि सर्जन, टाटा हॉस्पिटल

१६ टक्के युवक तंबाखूच्या विळख्यात

युवकांमध्ये तंबाखूचा होणारा वापर हा अगदी कमी वयात होतो. ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे. १५ वर्ष वयोगटातील तब्बल १६ टक्के युवक हे तंबाखूचे कुठल्या न कुठल्या रुपात सेवन करत असतात. म्हणूनच तंबाखूच्या वापरावर निर्बंध आणत अनेक मृत्यू हे टाळता येण्यासारखे आहेत, असा निष्कर्ष सर्वेक्षणात काढण्यात आल्याचे आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: July 12, 2018 6:25 PM
Exit mobile version