ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 667 मिमी पाऊस

ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 667 मिमी पाऊस

heavy rain

गेल्या चार दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात 667 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जेारदार पावसामुळे रेल्वे आणि वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. त्यामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना खेाळंबा सहन करावा लागला.

रात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाचा जोर पहाटेपासून वाढल्याने त्याचा फटका लोकल सेवेला बसला. कुर्ला ते शीव रूळावर पाणी भरल्याने कल्याण डोंबिवलीहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. लोकल सेवेचा जबर फटका प्रवाशांना सहन करावा लागला. डोंबिवली स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. अनेकांना लोकलमध्येच ताटकळत राहावे लागले. कल्याण डोंबिवली सखल भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे एकिकडे लोकल सेवेला फटका बसला असतानाच दुसरीकडे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. कल्याण शिवाजी चौकापासून ते दुर्गाडी पुलापर्यंत प्रचंड वाहनांची रांग लागली होती. दुर्गाडी पुलावरून कल्याण भिवंडीसह ठाणे आणि मुंबईकडे जाणार्‍या वाहनांची वर्दळ असते. पावसामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने पुलावर वाहतूक कोंडी झाली होती.

मागील 24 तासांत ठाणे 102 मिमी, कल्याण 90.80 मिमी, मुरबाड 55 मिमी उल्हासनगर 60 मिमी अंबरनाथ 58 मिमी भिवंडी 200 मिमी तर शहापूर 101 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

First Published on: July 2, 2019 4:27 AM
Exit mobile version