कल्याण डोंबिवलीतील ७५ ट्रॅफिक वॉर्डन सहा महिने वेतनापासून वंचित

कल्याण डोंबिवलीतील ७५ ट्रॅफिक वॉर्डन सहा महिने वेतनापासून वंचित

कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याणय डोंबिवली शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला केडीएमसीने ७५ वाहतूक स्वयंसेवक ( ट्रॅफिक वॉर्डन ) ची नियुक्ती केली आहे. शहरात दिवसरात्र वाहतूक केांडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वॉर्डन मागील सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. मात्र, त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनाही वेळ नसल्याने वॉर्डनमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्या मदतीला केडीएमसीने ७५ वॉर्डनची नियुक्ती केली आहे. सफेद शर्ट आणि निळी पॅन्ट असा वॉर्डनचा पोशाख असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीला ते शहरातील विविध चौकात सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी कार्यरत असतात. महापालिकेकडून त्यांना ५ हजार रुपये मानधन दिले जाते. तसेच तब्बल १२ तास ड्यूटी करावी लागते. मात्र, पालिकेकडून मागील सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पालिकेकडे अनेकवेळा मागणी करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने एका वॉर्डने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

तुटपुंज्या मानधनावरच अनेकांना कुटुंबाची कसरत करावी लागते. काही महिन्यांपूर्वी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालिका व पोलीस प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी महापालिकेकडून वॉर्डनला दरमहा देण्यात येणारी ५ हजार रुपये रक्कम वाढवून ती किमान वेतन कायद्यानुसार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. अन्यथा पालिकेला नोटीस देण्याचाही इशारा दिला होता.

तसेच वॉर्डनची संख्या वाढविण्याबाबतही सूचना केली हेाती. मात्र, किमान वेतन दूरच राहिले असून, त्यांना वेळेवरही वेतन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किमान वेळेवर वेतन मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. वॉर्डनला वेतन देण्याची जबाबदारी ही पालिकेची असल्याचे एका वाहतूक पोलीस अधिकार्‍याने सांगितले, तर दुसरीकडे पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. कंत्राटदारांच्या कामाची अनेक बिले थकली आहेत. त्यामुळेच वॉर्डनच्या वेतनाला विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून बोललं जातय.

पालिका क्षेत्रातील वाहन संख्या:

दुचाकी: ७०,१३४
चारचाकी: १४,२४९
ऑटो रिक्षा: १२,२९८

First Published on: April 21, 2019 4:12 AM
Exit mobile version