महापालिका रुग्णालयांसाठी ७६ व्हेंटिलेटरची खरेदी

महापालिका रुग्णालयांसाठी ७६ व्हेंटिलेटरची खरेदी

व्हेंटिलेटर

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलांसाठी ऍडल्ट व्हेंटिलेटरची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याअंतर्गत ७६ व्हेंटिलेटरची खरेदी करण्यात येत आहे. यातील शीवच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण हॉस्पिटलात २८ व्हेंटिलेटर दिले जाणार आहेत. या व्हेंटिलेटरच्या पुरवठ्यासाठी कंत्राटदाराने ४१ अधिक दराने बोली लावली होती. परंतु त्याच कंत्राटदाराने वाटाघाटीनंतर दर कमी करून हे व्हेंटिलेटर ३ टक्के अधिक दराने देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आधीच्या निविदेत ठरलेली एकमेव कंपनी आणि त्यातच ३८ टक्के दर कमी केल्याने कंत्रादाराची महापालिकेची तिजोरी लुटण्याचे इरादे होते, हे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे व्हेंटिलेटरची खरेदी वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका हॉस्पिटलात कृत्रिम श्वसनासाठी वापरण्यात येणारे व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते. महापालिकेच्या ३ प्रमुख हॉस्पिटलांसह विशेष आणि उपनगरीय हॉस्पिटलांवर रुग्णांचा भार वाढतो आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती मागणी लक्षात घेता व्हेंटिलेटरची संख्या कमी पडते. त्यामुळे व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ७६ ऍडल्ट व्हेंटिलेटरची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मागवलेल्या निविदेत ड्रॅगर मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही एकमेव कंपनी पात्र ठरली आहे.

निविदा प्रक्रियेत किमान ३ कंत्राटदारांमध्ये स्पर्धा व्हायला हवी, परंतु यामध्ये ड्रॅगर मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड या एकमेव कंपनीने भाग घेतला होता आणि याच कंपनीने अंदाजित रकमेपेक्षा ४१ टक्के अधिक बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु याच कंपनीने वाटाघाटीनंतर दर कमी करून देण्याची तयारी दर्शवली आहे. पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटसह प्रत्येकी १२ लाख ०८ हजार रुपयांना व्हेंटिलेटरची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे यासर्व व्हेंटिलेटरसाठी ९ कोटी १८ लाख रुपये एवढे खर्च केला जात आहे. याबाबतच प्रस्ताव सध्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

केईएम :१३
लोकमान्य टिळक :२८
नायर दंत : ०१
नाक, कान, घसा हॉस्पिटल : ०१
उपनगरीय हॉस्पिटले : ३३

First Published on: February 19, 2019 6:18 AM
Exit mobile version