चिंताजनक; बेस्टचे ८ कर्मचारी कोरोनाग्रस्त

चिंताजनक; बेस्टचे ८ कर्मचारी कोरोनाग्रस्त

कोरोनापासून बचाव करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रबोधन

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी बेस्टमध्ये ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेस्टमधील एकूण कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. तर वाडी बंदर येथील रेल्वे पोलीस आयुक्तालयातील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलिस, डॉक्टर, नर्स, मंत्रालय, महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी बेस्टच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आणि फेऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे बसेसमध्ये सोशल डिस्टिसिंगचे अनेकदा तीनतेरा वाजले आहेत. आता तर शुक्रवारी बेस्टमध्ये ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यामध्ये परिवहन विभागातील ७ आणि अभियांत्रिकी विभागातील एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बेस्टमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. तर १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण

वाडी बंदर येथील रेल्वे पोलीस आयुक्तालयातील पोलिसाला कोरोनाची लागण झाली. या पोलिसाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. रेल्वे पोलीस आयुक्तालयातील टेक्निकल विभागात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. इतर कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला क्वारंटाइन केले नाही. दरम्यान, संपूर्ण कार्यालय सॅनिटायझर केले आहे. संबंधित माहिती महापालिकेला कळवली आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली.

First Published on: May 8, 2020 7:29 PM
Exit mobile version