मुंबईतील ८० नागरिकांनी नाकारली खड्ड्यांच्या बक्षिसाची रक्कम

मुंबईतील ८० नागरिकांनी नाकारली खड्ड्यांच्या बक्षिसाची रक्कम

रस्त्यावर पडलेला खड्डा दाखवा आणि ४८ तासांमध्ये खड्डा न भरल्यास ५०० रुपयांचे बक्षीस मिळवा, अशाप्रकारची बक्षीस योजना जाहीर केल्यानंतर यामध्ये १५५ ठिकाणी नियोजित वेळेत खड्डे भरले गेलेच नव्हते. त्यामुळे १५५ लोकांपैकी केवळ ७५ तक्रारदारांनीच ५०० रुपयांचे बक्षीस आतापर्यंत स्वीकारले आहे. मात्र, उर्वरीतपैकी काही लोकांनी बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. तरीही या बक्षीस योजनेवर ३७ हजार ५०० रुपये खर्च झाले आहेत. हे सर्व पैसे अधिकार्‍यांच्या खिशातून खर्च केले आहेत.

मुंबईतील खड्डयांचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर पडलेला खड्डा दाखवा आणि हा खड्डा भरला न गेल्यास ५०० रुपये देण्यात येतील, अशी योजना जाहीर केली होती. या योजनेतंर्गत नागरिकांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे महापालिकेच्या पोर्टलवर अपलोड केले. त्यानुसार महापालिकेने या खड्डयांचे निवारण केले. परंतु काही खड्डयांच्या तक्रारींचे निवारण हे निश्चित केलेल्या वेळेत न झाल्याने संबंधित तक्रारदारांना जाहीर केल्याप्रमाणे ५०० रुपयांचे बक्षीस स्वरुपात घेण्यात देण्यात आले. या योजनेमध्ये एकूण १६३० खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी निश्चित केलेल्या वेळेत १४७५ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. तर १५५ तक्रारींचे निवारण करण्यात आले नव्हते. त्यामुळे रस्ते विभागाकडून ७५ तक्रारदार नागरिकांनीच प्रत्येकी ५०० रुपयांची बक्षिसाची रक्कम स्वीकारली. मात्र, उर्वरीत काही नागरिकांनी बक्षीसाची रक्कम स्वीकारण्यास नकार कळवला असल्याची माहिती रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

महापालिका प्रशासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर याबाबत लोकप्रतिनिधींमधून तीव्र नाराजी पसरली होती. महापालिका करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचे सांगत कोणत्याही स्वरुपाची मान्यता न घेता नियमबाह्यप्रकारे ही रक्कम दिली जात असल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी केला होता. विरोधी पक्षनेते रवी राजा तसेच भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर बक्षीसाची ही रक्कम विभागाच्या सहायक आयुक्तांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले होते. त्यानुसार बक्षिसाची ही रक्कम विभागातील सहायक आयुक्त, तसेच रस्ते अभियंता यांच्या खिशातून परस्पर देण्यात आली होती. त्यामुळे तब्बल ३७ हजार ५०० रुपये अधिकार्‍यांच्या खिशातून काढून घेतले आहे.

First Published on: December 22, 2019 11:00 PM
Exit mobile version