धारावी, माहिम, दादरमध्ये दिवसभरात ८३ रुग्ण

धारावी, माहिम, दादरमध्ये दिवसभरात ८३ रुग्ण

मागील अनेक दिवसांपासून दादर, धारावी आणि माहिम या विभागातील जी-उत्तर प्रभागांमध्ये रुग्णांची संख्या कमी होत असतानाच पुन्हा एकदा या विभागात संसर्गाचे प्रमाण वाढू लागले. या जी-उत्तर विभागात दिवसभरात ८३ रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये धारावी व माहिममध्ये प्रत्येकी २५ आणि दादरमध्ये ३३ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने या विभागाची चिंता वाढलेली आहे.

धारावीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने समाधानाची बाब व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा रुग्णांचा आकडा पुढे सरकताना दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये विशीच्या आत असलेल्या रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात धारावीत २५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीत एकूण बाधित रुग्णांची संख्या २०६८ एवढी झाली आहे. तर मृतांचा आकडा ७७ वर पेाहोचला आहे.

धारावीपाठोपाठ आता माहिममध्ये पुन्हा काही अंशी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दिवसभरात माहिममध्ये ३३ तर दादरमध्ये २५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी एकूण रुग्णांची संख्या अनुक्रमे ७९२  व ५४० एवढी झालेली आहे.

आतापर्यंत ५० टक्के रुग्ण झाले बरे

आतापर्यंत जी-उत्तर विभागात एकूण बाधित रग्णांची संख्या ३४०० एवढी असून त्यातील १६२७ एवढे रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामुळे ५० टक्के बाधित रुग्ण बरे झालेले आहेत. यामध्ये धारावीत २०६८ रुग्णांपैकी १०४० रुग्ण बरे झाले आहेत. तर माहिममध्ये ७९२  बाधित रुग्णांपैंकी ३४५ आणि दादरमध्ये ५४० रुग्णांपैंकी २४२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

First Published on: June 15, 2020 7:39 PM
Exit mobile version