मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी संख्येत ९२ टक्के वाढ; प्रजा फाउंडेशनचा अहवाल

मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी संख्येत ९२ टक्के वाढ; प्रजा फाउंडेशनचा अहवाल

मुंबई -: मुंबई महापालिका शिक्षण विभागाने काही बाबी वगळता कोरोना कालावधीतही शिक्षण विभागात चांगली कामगिरी केली असल्याची कौतुकाची थाप ‘प्रजा फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने आपल्या अहवालातून दिली आहे. मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’ मध्ये २०१४ – १५ मध्ये असलेली २७,४६४ विद्यार्थी संख्या २०२० – २१ मध्ये ५२,६६२ एवढी म्हणजे ९२ टक्क्यांनी वाढली आहे. तर मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ३,००,७४६ एवढी असताना आता त्या तुलनेत २०१८-१९ ते २०२१- २२ मध्ये ६ टक्केने म्हणजे १७,२५६ ने वाढ झाली असून ही संख्या ३,१८,००२ वर गेली आहे, अशी माहिती प्रजाने दिली आहे.

पालिका शाळेत विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि पालकांचा पालिका शाळांकडील वाढता ओढा पाहता पालिकेने आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आणखीन चांगल्या व नवीन सेवासुविधा देणे, तसेच, शिक्षणाच्या गुणवत्तेकडे तातडीने अधिक लक्ष देणे अपेक्षित आहे, अशा मौलिक सूचना प्रजा फाउंडेशनतर्फे व्यवस्थापकीय विश्वस्त नीताई मेहता यांनी प्रजाच्या अहवालामधून केल्या आहेत.

इंग्रजी माध्यमात २१,२२६ विद्यार्थ्यांची वाढ

महापालिका शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडून मराठी माध्यमाच्या विद्यार्थी संख्येतही मोठी घट झाल्याचा आरोप भाजपने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर अनेकदा केला आहे. तर, २०१८-१९ ते २०२१ – २२ दरम्यान मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ७४,८८४ वरून १,०१,११० एवढी म्हणजे २७ टक्केने म्हणजे २१,२२६ ने वाढली आहे, अशी माहितीही प्रजाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांना मिळणारे प्रोत्साहन पाहता भाजपच्या आरोपांना बळकटी मिळाली आहे.

पालिका शाळेत फक्त २६ टक्के विद्यार्थ्यांचीच आरोग्य तपासणी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील काही बाबींचा आढावा घेताना प्रजाने, शैक्षणिक कामगिरीबाबत कौतूक केले असले तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत पालिका प्रशासन कमालीचे उदासीन असल्याचा आरोप केला आहे. मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग वाढला होता. गेल्या अडीच वर्षात कोरोनाचा संसर्ग व रुग्ण संख्या पाहता पालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी गांभीर्याने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २०२०-२१ मध्ये पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच झाली नव्हती, असा आरोप प्रजातर्फे करण्यात आला आहे.

मात्र २०१५-१६ मध्ये पालिकेच्या शाळांमधील एकूण ३,८३,४८५ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४९ टक्के १,८९,८०९ विद्यार्थ्यांचीच आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या तुलनेत, २०२१-२२ मध्ये त्याहून कमी म्हणजे एकूण विद्यार्थी संख्येपैकी फक्त २६ टक्के विद्यार्थ्यांचीच आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप प्रजाचे योगेश मिश्रा यांनी केला आहे.

प्रति विद्यार्थी खर्च ४९,१२६ रुपयांवरून वरून १,०२,१४३ रुपयांवर

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन शालेय आहारासोबतच २७ प्रकारच्या शालेय वस्तूंची भेट मोफत स्वरूपात दरवर्षी देते. पालिका २०१२-१३ ते २०२२-२३ या कालावधीत शिक्षणासाठी २,१३५ कोटी रुपये ते ३,२४८ कोटी रुपये इतका खर्च करीत होते. म्हणजेच एकूण खर्चात ५२ टक्के एवढी वाढ करण्यात आली. तर २०१२ – १३ मध्ये पालिका शाळेत प्रति विद्यार्थी ४९,१२६ रुपये इतका खर्च करीत होती. तर २०२२- २३ मध्ये या खर्चात तब्बल १०८ टक्क्यांनी वाढ झाली असून हा खर्च प्रति विद्यार्थी खर्च १,०२,१४३ वर गेला आहे. मात्र तरीही पालिका शाळेत विद्यार्थ्यांना सरसकट पाठविण्याबाबत पालक संभ्रमात असल्याचे प्रजाने म्हटले आहे.


 

First Published on: December 5, 2022 8:42 PM
Exit mobile version