फ्लॅटचे आमिष दाखवून 98 लाख रुपयांची फसवणूक

फ्लॅटचे आमिष दाखवून 98 लाख रुपयांची फसवणूक

फ्लॅटचे आमिष दाखवून सुमारे 98 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिकांसह इतर आरोपींविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात जितेंद्र जैन, जिजेंद्र जैन, सिद्धीविनायक, संतोष माने, सलील माने यांच्यासह इतर आरोपींचा समावेश ते सर्वजण मधुरा इंटरप्रायसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आणि मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास आरएके मार्ग पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी सांगितले.

प्रकाश रामचंद्र कोठारी हे चिराबाजार येथील फणसवाडी, सियाल हाऊस इमारतीमध्ये राहतात. सात वर्षांपूर्वी परळच्या जेरबाई वाडिया रोडवरील कमला ट्रायडंट नावाच्या एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. यावेळी प्रकाश कोठारी यांनी या इमारतीमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅट बुक करताना त्यांनी मधुरा इंटरप्रायजेस प्राव्हेट लिमिटेडच्या मालकासह इतर आरोपींना 98 लाख रुपये दिले होते. त्यापैकी 77 लाख रुपये रोख तर 21 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले होते. ही रक्कम घेतल्यानंतर त्यांना फ्लॅटची कागदपत्रे देण्यात आली होती. तसेच तीन ते चार वर्षांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र सात वर्षे उलटूनही कंपनीने त्यांना फ्लॅटचा ताबा न देता त्यांची फसवणूक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच प्रकाश कोठारी यांनी लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी संबंधित सर्व आरोपींविरुद्ध पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी सांगितले. तक्रारदारासह इतर काही आरोपींना या टोळीने अशाच प्रकारे गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: December 15, 2018 4:00 AM
Exit mobile version