CoronaVirus: कोरोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहणार १००० बेडचे रुग्णालय

CoronaVirus: कोरोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहणार १००० बेडचे रुग्णालय

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतील बैठकीत घेतला. यावेळी, महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. अंकित ठक्कर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी उपस्थित होते. केंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश शिंदे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले.

इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची योग्य विभागणी करून आवश्यक उपचार केले जावेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कंटेनमेंट एरियामध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही केली. कोरोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात १००० बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

तीन आठवड्याच्या आत रुग्णालय उभे करा

तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. या ठिकाणी ५०० बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.

First Published on: May 4, 2020 8:52 PM
Exit mobile version