आहेर मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह ६ जणांवर गुन्हा दाखल,चौघांना अटक

आहेर मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह ६ जणांवर गुन्हा दाखल,चौघांना अटक

ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना बुधवारी झालेल्या मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच अभिजित पवार, विक्रांत खामकर आणि हेमंत वाणी यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर तीन कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गंभीर कलमांखाली बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी अभिजित पवार, विक्रांत खामकर, हेमंत वाणी आणि विशंत गायकवाड या चौघांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयातून अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. महेश आहेर यांनी नोंदवलेल्या तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकाम तोडल्याचा तसेच त्यांचे न ऐकल्याचा राग मनात धरून कट रचून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार तुरुंगात असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाली. ही क्लिप व्हायरल होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आहेर यांना बुधवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या आवारात मारहाण करण्यात आली होती.

मागील अनेक वर्षांपासून महापालिकेचा मालमत्ता विभाग त्यांच्या ताब्यात आहे. म्हाडाचे १०० फ्लॅट्स खोट्या सह्या करून त्यांनी वेगवेगळ्या माणसांना विकले आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रताही खोटी आहे. या महापालिकेत वशिला असेल तर फक्त आयुक्त होता येत नाही, मात्र इतर कोणतीही पदे भूषविता येतात. त्यामुळेच मला हे पाऊल उचलावे लागले. एवढे होऊन त्याचे साधे टेबलही हलविले जाणार नाही. महापालिका आयुक्त किंवा पोलीस यात काही करू शकत नाहीत, ते हतबल आहेत. फक्त हा बाबाजी कोण आहे याची माहिती पोलिसांनी घ्यावी.
-जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

ती क्लिप काय आहे हे मला माहीत नाही, परंतु त्यातील आवाज माझा नाही. २०१९ पासून मी मुंब्य्राचा सहायक आयुक्त होतो. तेव्हा मी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत होतो. तेव्हापासून मला मारण्याचा कट रचला जात होता. मला काही लोकांकडून धमक्या येत होत्या. आव्हाड यांच्याशी बोलण्यास आम्ही घाबरतो. कारण ते संभाषण टेप करून व्हायरल करतात. ते सांगतील तशा कारवाया कराव्या लागत होत्या. मला आणि माझ्या कुटुंबाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे.
– महेश आहेर, सहायक आयुक्त, ठामपा

First Published on: February 17, 2023 5:19 AM
Exit mobile version