BJP : भडकाऊ भाषण केल्याने नितेश राणे आणि गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

BJP : भडकाऊ भाषण केल्याने नितेश राणे आणि गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मुंबई : जानेवारीत ठाणे जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि गीता जैन या दोघांनीही आक्षेपार्ह भाषण केले होते. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात संबंधित पोलीस आयुक्तांना या दोन्ही नेत्यांनी आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषणे केली होती का? याची वैयक्तिक पडताळणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांना तपासादरम्यान दोन्ही नेत्यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि गीता जौन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. (A case has been registered against Nitesh Rane and Geeta Jain in the case of inflammatory speech)

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितले की, या वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी नितेश राणे आणि गीता जैन यांनी केलेली भाषणे अपमानास्पद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नितेश राणेंवर मुंबईतील मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर भागातील सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे. तर गीता जैन यांच्यावर मीरा भाईंदरमधील सभेत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – Bacchu Kadu : हनुमानाने…; अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळल्याने बच्चू कडूंची खोचक टीका

पोलिसांनी या दोन्ही नेत्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153A (धर्माच्या आधारावर लोकांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 504 (चिथावणी देण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तर मीरा भाईंदरमध्ये 22 ते 26 जानेवारी दरम्यान उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या संदर्भात अन्य व्यक्तींविरुद्ध 13 स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वेणेगावकर यांनी सांगितले. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जून रोजी निश्चित केली.

जातीय हिंसाचारानंतर प्रक्षोभक भाषणे

दरम्यान, या वर्षी जानेवारीमध्ये मीरा रोड येथे नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या याचिकांमध्ये दावा करण्यात आला आहे की, या भागातील जातीय हिंसाचारानंतर ही भाषणे देण्यात आली होती. या याचिकांमध्ये आमदारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती करण्यात आली होती.

हेही वाचा – BJP VS Congress : संविधान बदलणाऱ्या काँग्रेसचाच भाजपाविरोधात अपप्रचार; विनोद तावडेंची टीका

First Published on: April 23, 2024 8:38 PM
Exit mobile version