केडीएमसीच्या अभियंत्यावर प्राणघातक हल्ला

केडीएमसीच्या अभियंत्यावर प्राणघातक हल्ला

केडीएमसीच्या अभियंत्यावर हल्ला

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर आज, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. डोंबिवली स्कायवॉकवरच हा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यात सुभाष पाटील हे जखमी झाले असून, त्यांना डोंबिवलीतील आयकॉन या खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. हल्लेखोर हे तोंडावर रूमाल बांधून आले होते.

असा घडला हल्ला

डोंबिवली विभागीय कार्यालयात बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून पाटील हे कार्यरत आहेत. संध्याकाळी सहाच्या सुमारास पाटील हे कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. डोंबिवली स्कायवॉकवरून चालत रेल्वे स्थानकाकडे पायी जात असतानाच चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या पेाटावर आणि छातीवर वार करण्यात आले आहे. संध्याकाळच्यावेळी स्कायवॉकवर गर्दी होती. मात्र गर्दीतून हे चौघेजण पळून गेले. या प्रकाराने नागरिकही भयभती झाले होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमी पाटील यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच महापौरांसह पालिकेतील सर्व अधिकारी नगरसेवक यांनी रूग्णालयात धाव घेतली आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

First Published on: March 22, 2019 9:06 PM
Exit mobile version