भायखळ्याच्या राणी बागेतील १२० वर्षे जुन्या प्याऊला नवीन संजीवनी

भायखळ्याच्या राणी बागेतील १२० वर्षे जुन्या प्याऊला नवीन संजीवनी

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, मुंबई महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत विविध प्रकारच्या सुशोभीकरणाची १,७२९ कोटींची कामे जोमात सुरू आहेत. मुंबई महापालिकेकडून शिवकालीन किल्ले, पुरातन वास्तूंचेही जतन व संवर्धन करण्यात येत आहे. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या प्याऊंचेही जतन व संवर्धन करण्यात आले आहे. भायखळा येथील राणी बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’ चेही जतन व संवर्धन करण्यात आले आहे. तसेच, या प्याऊला जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ ची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे या जुन्या प्याऊचे रुपडे पालटले आहे.

जुन्या प्याऊ १२० वर्षांपूर्वीपासून मुंबईसारख्या शहरात सामाजिक, सांस्कृतिक वारशाच्या एक अविभाज्य भाग होत्या. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बाजारपेठा, बंदरे, औद्योगिक क्षेत्र, उद्याने, ट्राम अथवा रेल्वे स्थानकांच्या बाहेर नागरिकांना आणि प्राणी, पक्षी यांना देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या पाणपोई उभारल्या जात होत्या. प्रसंगी आपल्या नातेवाईकांच्या, प्रियजनांच्या, स्नेहीजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पाणपोई बांधल्या जात होत्या. प्याऊ म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई होय. काही प्याऊ या व्यापारी समुदायाच्या सदस्यांनी, सामाजिक दानशुरांनी स्मारक संरक्षित केल्या होत्या. शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेच्या आगमनानंतर या पाणपोई हळूहळू वापरातून बाद होऊ लागल्या.

आता मोजक्याच प्याऊ अर्थात पाणपोई शिल्लक आहेत. हा पुरातन वारसा शोधून त्याचे संवर्धन करण्याचे पर्यायाने सांस्कृतिक ठेवा जपण्याचे प्रयत्न महापालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षामार्फत करण्यात येत आहेत.
यापैकी महत्त्वाच्या असलेच्या चार पुरातन प्याऊंचे संवर्धन करुन त्यांना राणीच्या बागेत पुनर्स्थापित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या चारही प्याऊंची निर्मिती साधारपणे सन १९०३ ते १९३३ या कालावधीमध्ये झाली होती. वारसा स्तर ३ स्थापत्य प्रकारामध्ये या चारही प्याऊंची निर्मिती मोडते. सेठ सामलदास नरसीदास प्याऊ, अर्देशीर दादाभॉय दादीशेट प्याऊ (२), खिमजी मुलजी रंदेरिया प्याऊ अशा या एकूण चार प्याऊ आहेत. या चारही प्याऊ राणीच्या बागेत मागील अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवलेल्या होत्या. त्यांचे योग्यप्रकारे जतन करण्याचे काम आता पूर्ण झाले आहे.

३० प्याऊंचे जतन व संवर्धन
सार्वजनिक ठिकाणी प्याऊ म्हणजे महत्वाचे वैशिष्ट्य मानले जायचे. काळाच्या ओघात या पुरातन प्याऊ वापरातून बाद होऊ लागल्या तसेच देखभाल, दुरूस्ती अभावी अडगळीत पडल्या होत्या. परंतु मुंबई महापालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षामार्फत संपूर्ण मुंबईतील तब्बल ३० प्याऊंचे जतन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यापैकी या चार प्याऊंसह एकूण नऊ प्याऊंचे संवर्धन व पुनर्स्थापन आता पूर्ण झाले आहे. उर्वरित प्याऊंची कामे प्रगतिपथावर आहेत.

प्याऊला ‘कोई फिश पाँड’ ची जोड
सुमारे १२० वर्षे जुन्या असलेल्या ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’ चे संवर्धन करुन त्याला जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ ची जोड देत नवीन रुप देण्याची कामगिरी पालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षाने यशस्वीपणे पार पाडली आहे. एकूण चार पुरातन प्याऊ संवर्धित करुन राणीच्या बागेत पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी ते एक नवीन आकर्षण ठरु लागले आहे.

First Published on: March 25, 2023 10:56 PM
Exit mobile version