बलात्कार पीडित मुलीच्या पलायननाट्याने खळबळ

बलात्कार पीडित मुलीच्या पलायननाट्याने खळबळ

बलात्कार

अंधेरीतील बालभवनातून एका बलात्कार पीडित पंधरा वर्षांच्या मुलीने पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून या मुलीचा शोध सुरू केला आहे. अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक मुलीचे बालभवन असून तिथेच गुरुवारी 10 ऑक्टोबरला या बलात्कार पीडित पंधरा वर्षांच्या मुलीला आणण्यात आले होते. या मुलीचे अपहरण करून नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. हा प्रकार उघडकीस येताच आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहरणासह बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर या मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

बोरिवलीतील बालकल्याण समितीच्या आदेशानंतर तिला अंधेरीतील मुलीसाठी असलेल्या बालभवनात ठेवण्यात आले होते. दहा ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत ती तिथेच राहत होती. मात्र मंगळवारी 15 ऑक्टोबरला सर्व मुली जेवणानंतर आंघोळीला गेल्यानंतर ती बालभवनातून पळून गेली. हा प्रकार नंतर तिथे असलेल्या केअरटेकर महिलांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. बालभवनातून पळून गेल्यानंतर ती तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तिच्या मालवणीतील राहत्या घरी गेली असावी असा संशय होता, त्यामुळे या महिला अधिकार्‍यांनी तिथे जाऊनही चौकशी केली होती, मात्र ती तिथेही आली नव्हती. या घटनेनंतर अखेर त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या मुलीचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.

First Published on: October 18, 2019 1:31 AM
Exit mobile version