आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हक्कासाठी त्रिपक्षीय समिती गठीत होणार

आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हक्कासाठी त्रिपक्षीय समिती गठीत होणार

संभाजी पाटील-निलंगेकर

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या समस्यांवर तोडगा आणि या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्रीपक्षीय समिती गठित करण्याचे निर्देश कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी येथे दिले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत आज कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान ते बोलत होते. याकार्यक्रमाला टेक महिंद्रा, इन्फोसिस टेक्नॉलॉजि लि, विप्रो टेक्नॉलॉजि कंपनी उपस्थित होत्या.

त्रिपक्षीय समतीशी संपर्क करा

या बैठकी दरम्यान, निलंगेकर यांनी सांगितले की, कामाच्या वेळेत काही अडचणी असल्यास त्यांनी त्रिपक्षीय समितीशी संपर्क साधने सोयीचे ठरेल. त्रिपक्षीय समिती या कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवेल. त्रिपक्षीय समितीमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगार वर्ग, कंपनी मालक, कामगार विभागाचे अधिकारी यांचा समावेश असेल. त्रिपक्षीय समिती ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी येथील कामगार आणि शासनामधला सेतू बनणार असल्याचे निलंगेकरांनी सांगितले.

पुण्यात १ लाख ६२ हजार आयटी कर्मचारी

पुणे जिल्ह्यात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापना प्रामुख्याने हिंजवडी, हडपसर, खराडी, कल्याणीनगर, बाणेर येथे कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण ७६२ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापना कार्यरत असून, यामध्ये एकूण १ लाख ६२ हजार कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची फोरम फॉर आई.टी. एम्प्लॉज ही संघटना कार्यरत असून, श्रमिक संघटना अधिनियम, १९२६ अंतर्गत या कार्यालयात हे नोंदीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पुणे येथील काही माहिती व तंत्रज्ञान आस्थापना या स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ) अंतर्गत येत असल्याने त्यांना सोशल इकॉनॉमिक झोन अधिनियम २००५ च्या तरतुदी लागू होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

First Published on: February 12, 2019 9:26 PM
Exit mobile version