पार्किंग समस्येला रेड सिग्नल कधी मिळणार?

पार्किंग समस्येला रेड सिग्नल कधी मिळणार?

मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहने उभी करण्यात येतात.

पालिकेने केले धोरणात बदल

मुंबईत एकूण ९१ वाहनतळे असून यावर ११ हजार २७१ वाहने उभी केली जातात. या वाहनतळांच्या व्यवस्थापनाचे काम कंत्राटदारांना दिले जात होते. वाहनतळाचे व्यवस्थापन करणारे कंत्राटदार ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम घेत असल्याचे उघड झाले होते. याबाबत पालिकेकडे तक्रारी आल्यावर वाहनतळाचे व्यवस्थापन करण्याच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. महिला बचत गटांना कामे देऊन महिलांचे सबलीकरण करता यावे व सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना कामे देण्यात यावी. बेरोजगार युवकांना काम देता यावे. म्हणून वाहनतळाचे व्यवस्थापन महिला बचत गट व सुशिक्षित बेरोजगार संस्था, अपंगांच्या हक्काच संरक्षण आणि समान संधी देण्याचा विचार झाला. दिव्यांग व्यक्ती अधिनियम १९९५च्या अंमलबजावणीबाबतची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने जुन्या कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढली. ५० टक्के वाहनतळांचे कंत्राट महिला बचत गटांसाठी, २५ टक्के सुशिक्षित बेरोजगार संस्थांसाठी तर ३ टक्के अपंगांच्या संस्थांना वाहनतळ व्यवस्थापन करण्यासाठी देण्यात यावे, असा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

मुंबईतील एकूण वाहनतळ

शहर व उपनगरात ९१ वाहनतळ असून त्यावर ११ हजार २७१ वाहने उभी केली जातात. वाढत्या वाहनसंख्यांमुळे पार्किंगची संख्या ३०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

सीएसटीएम, कुलाबा, चर्चगेट

पार्किंगच्या शुल्क वाढीच्या प्रस्तावाला २०१५ साली सुधार समिती व पालिका सभागृहात मंजुरी दिली होती. त्यानुसार पालिकेने शुल्कवाढीचे नवे धोरण तयार केले आहे. कुलाबा, चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील फोर्ट बायलेन एरिया १ आणि २, वालचंद हिराचंद रोड १ आणि २, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्चिम), रिगल सिनेमा, एम.जी रोड (पश्चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे.एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नं. १, २ आणि ३, एम.जी. रोड , बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नं. ३, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथीबाई ठाकरसी मार्ग या १८ वाहनतळांवर नवे दर लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहनतळ, रस्त्यालगतचे वाहनतळ आणि निवासी वाहनतळ यात नव्या धोरणानुसार दुपटीने शुल्कवाढ करण्यात आली आहे.

पार्किंगचे दर

दुचाकी वाहन उभे करण्यासाठी तासाला ५ ते १५ रुपये

 चारचाकी वाहन उभे करण्यासाठी तासाला २० ते ६० रुपये

तासाहून अधिक काळ वाहनतळावर वाहन राहिल्यास पाच रुपयांच्या पटीत शुल्कवाढ 

निवासी वाहनतळ योजनेनुसार इमारतीबाहेरील रस्त्यावर दिवसा वाहन उभे करण्यासाठी ३,९६० रुपये, तर रात्रीच्या वेळेसाठी १,९८० रुपये मोजावे लागणार.

नो पार्कींग क्षेत्रात वाहन उभे केल्यास ते वाहन उचलून वाहतूक चौकीजवळ आणली जाते. संबंधित वाहनचालकावर १५ (२)(१०) १७७ च्या नियमानुसार कारवाई करुन २०० कींवा ३०० रुपये दंड वसूल केला जातो. तसेच कॉर्नर पार्किंग केल्यास (१५) (२) (१) १७७ च्या नियमानुसारसुद्धा ३०० किंवा २०० रुपयांचा दंड आकारला जातो. डबल पार्कींग, गेट, शाळा, हॉस्पिटल, बस थांबा पार्कींग या ठिकाणी वाहने पार्क केलेली आढळल्यास त्यांच्याकडून ३०० अथवा २०० रुपयांचा दंड वसूल केला जातो. यासाठी वेगवेगळे नियम आहेत. १५ (२) १७७ नुसार १ ते १० यानुसार बेकायदेशीर पार्किंगसाठी दंड लागू होतो.

शहरांना वाहनांचा विळखा

मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये दिवसगणिक वाहनांची संख्या वाढत आहे. खासगी वाहनांची बेसुमार संख्या वाढत आहे, मात्र तेवढ्या वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या भीषण बनत चालली आहे. वास्तविक माणसांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही, तिथे मोठमोठ्या वाहनांचा उभे करायला जागा कुठून आणायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरटी दोन ते तीन वाहने असणारी घरेही बरीच आहेत. ही समस्या आता गांभीर्याने घेतली नाही, तर शहरांची दुरवस्था होणार आहे.

गोळीबार रोड नव्हे पार्किंग क्षेत्र

घाटकोपरमधील श्रेयस सिनेमापासून सुरू होत असलेल्या गोळीबार रोडवर मेट्रोच्या असल्फा स्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात दुतर्फा अवजड वाहने उभी करण्यात येतात. अवजड वाहनांबरोबरच या मार्गावर अनेक ठिकाणी दुहेरी गाड्या उभ्या केल्याने फारच कमी जागा शिल्लक राहते. त्यामुळे दोन्ही मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ताच शिल्लक राहत नसल्याने पादचार्‍यांनाही ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडतात.

सर्व्हिस रोडला गाड्यांचा विळखा

पूर्व द्रुतगती मार्गावरून गाड्या सुसाट जात असल्याने या मार्गाच्या लगत असलेल्या निवासी परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड बांधण्यात आला आहे. मात्र चेंबूरपासून ते विक्रोळी डम्पिंग ग्राऊंडपर्यंतच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात बेकायदा गाड्या उभ्या करण्यात येतात. चेंबूर ते घाटकोपर या परिसरात रिक्षा, चारचाकी मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या जातात. तर विक्रोळी परिसरात बस व अवजड वाहने उभी करण्यात येतात. या रस्त्यावर सकाळ व सायंकाळी अनेकजण जॉगिंगसाठी व फिरण्यासाठी येतात. यामुळे सर्व्हिस रोडचा वापर करणार्‍यांना वाहनचालकांना अवजड वाहने व नागरिकांच्या कचाट्यातून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते.

न्यायालयासमोरच बेकायदा पार्किंग

विक्रोळी न्यायालयामध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना आणण्यात येते. या वेळी येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. असे असतानाही न्यायालयाजवळच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा बेकायदा पार्किंग केली जाते. त्यामुळे तेथील निवासी इमारतीतील नागरिकांना याचा त्रास होतो. तर न्यायालयात येणार्‍या अनेकांनाही या त्रासाचा सामना करावा लागतो.

दहिसरमध्ये हायवेवर पार्किंग

दहिसरमधील पश्चिम द्रुतगती मार्गावरून जात असलेल्या मेट्रो मार्गाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदा रिक्षा उभ्या करण्यात येतात. यामुळे या रस्त्यावर पादचार्‍यांना रस्त्यावरून जाण्यासाठी जागा राहत नसल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. इतकेच नव्हे तर या रिक्षांमुळे वारंवार या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना वेळ, इंधन व पैसा वाया जात असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

नो पार्किंगला हरताळ

मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहने उभी करण्यात येतात. विशेष म्हणजे या भागामध्ये पालिकेकडून ‘नो पार्किंग’ असा फलक लावण्यात आलेला आहे. पालिकेच्या या फलकाला वाहनचालकांकडून सर्रासपणे हरताळ फासण्यात येतो, तरीही वाहतूक विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतो.

वांद्य्रातही ‘नो पार्किंग’

वांद्य्राला मेहबुब स्टुडिओ आणि वांद्रे चर्च पोलीस ठाण्यापासून ते लिंकरोडपर्यंत जागोजागी वाहतूक विभागाकडून ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे दुर्लक्ष करून वाहनचालक सर्रासपणे ‘नो पार्किंग’च्या फलकाखालीच बिनधास्तपणे गाड्या उभ्या करतात. या गाड्यांवर वाहतूक विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने परिसरातील नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल होत आहे.

माऊंट मेरी चर्चला पार्किंगचा विळखा

वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च हे जगविख्यात आहे. माऊंट मेरीच्या यात्रेला नुकतीच सुरुवात झाली असून तिच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. असे असतानाही या चर्चच्या परिसराला बेकायदा पार्किंगचा विळखा पडल्याचे पहायला मिळते.

पालिकेजवळच बेकायदा पार्किंग

मुंबईचा कारभार चालवणार्‍या महापालिकेमध्ये दररोज अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. परंतु महापालिकेच्या एका बाजूला असलेला डी. एन. मार्गावर दररोज बेकायदा पार्किंग करण्यात येते. डी. एन. मार्गावर टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपासून ते अंजुमन इस्लाम शाळेपर्यंत वाहने उभी असतात.

काळबादेवीला पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

काळबादेवी, दवा बाजार, लोहार चाळ हा संपूर्ण परिसर मार्केट परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. येथील बहुतांश रस्ते हे अरुंद असून प्रत्येक रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बेकायदा पार्किंग व वाहतूक कोंडी यामुळे येथे खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हातगाडी चालवणार्‍यांंना या बेकायदा पार्किंगमध्ये अडकून पडावे लागते.

बसमागे होते नशापान

माझगावमध्ये अनेक शाळा असून या परिसरात सर्रासपणे कोठेही पार्किंग केले जाते. यामध्ये बहुतांश शाळेच्या बसेस असतात. या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. दिवसा वाहतूक कोंडी होते तर रात्रीच्या वेळी याच बसगाड्यांच्या मागे बसून अनेकजण नशापान करतात. त्यामुळे महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण होते.

ठाण्यात पार्किंगचा बट्ट्याबोळ

ठाण्यात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यात दररोज २०० ते ३०० नव्या वाहनांची नोंद होते. शहरात नऊ ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र अजूनही ते काम सुरू झालेले नाही. त्यामुळे शहरात पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. ठाण्यात वाहन संख्येने १५ लाखांचा टप्पा गाठला असताना ठाण्यात अवघे दोनच पार्किंग प्लाझा आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळ आहे. मात्र ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी होते. परिणामी वेळ, इंधन आणि पैशाचाही अपव्यय होतो. रस्त्यावरील वाहन पार्किंगमुळे अनेकवेळा खटकेही उडतात. शहरात पार्किंगची समस्या बिकटच आहे. त्यासाठी पालिकेने नऊ ठिकाणी भुयारी पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय घेतला हेाता. मात्र त्यातील एकही काम अजून सुरू होऊ शकलेले नाही. तसेच शहरात पार्किंगसाठी जवळपास २७ भूखंड आरक्षित आहते. मात्र पार्किंग प्लाझा उभारण्यासाठी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनताच दिसून येते. त्यामुळे हे भूखंड केवळ कागदावरच राहिले आहेत. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पार्किंग धोरण तयार केले होते. प्रत्येक प्रभागात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, नो पार्किंगच्या जागा निश्चित करणे आणि बेशिस्त पार्किंगवर अंकुश ठेवण्यासाठी ट्राफिक वॉर्डन नेमणे, रखडलेल्या पार्किंगची कामे मार्गी लावणे आदी योजना धोरणात केल्या होत्या. मात्र त्याचीही ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. पे अ‍ॅण्ड पार्किंगचे सर्वसामावेशक असे नवे धोरण तयार करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. लवकरच नवे धोरण तयार होईल. त्यानंतर पार्किंगच्या समस्येतून मार्ग निघेल, असे पालिकेचे नगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबईत पार्किंगचे नियोजन फक्त कागदावरच

नवी मुंबईत विमानतळसह अनेक महत्वाचे प्रकल्प येत असल्याने शहराची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. खारघर ते द्रोणागिरीदरम्यान तिसरी मुंबई वसवली जात असल्याने लाखोंच्या संख्यने घरे व नागरिक वाढत आहेत. त्याचबरोबर गाड्यांचीही संख्या वाढत आहे. सीबीडी विभागात पाम बीच मार्गावर मोठ्या प्रमाणात बार-रेस्टॉरंट असून त्या ठिकाणी येणारे ग्राहक रोडवरच आपली वाहने उभी करतात. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. सिवूड्समध्ये रेल्वे स्टेशन परिसर त्याचबरोबर शॉपिंगला येणारे नागरिक मिळेल त्या जागेवर गाड्या पार्क करत असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. नेरूळ रेल्वे स्थानकावर पार्किंगची सुविधा मोठ्या प्रमाणात असतानाही वाहन चालक रस्त्यावरच वाहन पार्क करतात. वाशी, तुर्भे, सानपाडा व कोपरखैरणे विभागात गॅरेज मालकांनी पामबीचसह मुख्य रस्ताच व्यापला आहे. त्यांच्यावर कारवाई करताना अनेक वेळा प्रशासनाची दमछाक होते. अनेक वेळा कारवाया करूनही बेकायदा पार्किंगचा प्रश्न सुटत नसल्याने याचा फटका वाहन चालकांना बसतो. अनेक वर्षांपासून बहुमजली वाहनतळ योजना प्रशासनाच्या विचाराधीन आहे. बजेटमध्ये त्याची तरतूदही केली. मात्र ती अद्याप कागदावरच असल्याने शहराला बेकायदा पार्किंगचा विळखा पडला आहे.

मुंबईमध्ये वाहतूक विभागाच्या एकूण ३४ चौक्या आहेत. या चौक्यांच्या प्रत्येक विभागात काही ठराविक ठिकाणे ठरलेली आहेत. त्या व्यतिरीक्त पार्किंगला मनाई असूनसुद्धा पार्कींग केले जाते. बस थांबा, शाळा, फुटपाथ, डबल पार्कींग, झेब्रा क्रॉसिंग पार्कींग, उड्डाणपुले अशा ठराविक ठिकाणी नो पार्किंगचे आदेश आहेत. त्या ठिकाणी गाडी पार्क केलेली असल्यास ती उचलून चौकीत आणली जाते अन्यथा ताबडतोब वाहनधारकाकडून दंड वसूल केला जातो.
– अनिल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मलबार हिल वाहतूक पोलीस ठाणे.

काय म्हणतात वाहतूक तज्ज्ञ
मुंबईत सध्या गाड्यांची संख्या वाढत आहेत. दिवसांतील २४ तासांपैकी १८ ते २० तास गाड्या पार्किंगमध्ये असतात. त्यामुळे सध्या वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. पार्किंगची जागा ही स्केअर फूटमध्ये असेल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंगापूरमध्ये लॉटरी पध्दत आहे, त्याप्रमाणे विचार करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ऑफस्ट्रीट पार्किंग म्हणजेच ब्लेसमेंट, मल्टीपार्किंगसारख्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहेत. तर त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरात जो विभाग दाटीवाटीचा आहे त्याठिकाणी मोफत पार्किंग बंद करणे गरजेचे आहे. तर पालिकेने सुरू केलेल्या पार्किंगच्या धोरणाचाही विचार करणे गरजेचे आहे.
– विवेक पै, वाहतूक तज्ज्ञ.

 

 

 

फोटो – प्रवीण काजरोळकर, संदीप टक्के, अमित मार्कंडे
संकलन – अजेयकुमार जाधव, सौरभ शर्मा, विनायक डिगे, धवल सोलंकी, कृष्णा सोनारवाडकर, अक्षय गायकवाड, संतोष गायकवाड, योगेश महाजन.

First Published on: September 10, 2018 4:00 AM
Exit mobile version