गुजराती पोस्टर तात्काळ काढण्याचे दिले आदेश

गुजराती पोस्टर तात्काळ  काढण्याचे दिले आदेश

गुजरातीमध्ये रेल्वे सूचनाचे पोस्टर

सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत रेल्वे सूचनांचे पोस्टर लावले असल्याची बातमी दै. ‘आपलं महानगर’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झाल्यानंतर मनसैनिकांमध्ये खळबळ उडाली. तेव्हा मनसैनिकांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात धडक देऊन याची तक्रार केली. त्यानतंर पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांनी आरपीएफ पोलिसांना तात्काळ पोस्टर काढण्याचे आदेश दिले. मुंबईतील दुकानांवर इंग्रजी आणि गुजराती पाट्यांवरून मागील काळात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र रविवारी पुन्हा एकदा सांताक्रुझ रेल्वे स्टेशनवर गुजराती पोस्टर दिसल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर मनसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर आणि मनसे रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस जितेंद्र पाटील यांनी सोमवारी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेतली. या पोस्टरची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडे आपल्या भाषणात गुजराती पाट्यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर मनसैनिकांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अनेक गुजराती पाट्या असलेल्या दुकानांची तोडफोड केली. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवले जात आहे, असा आरोपसुद्धा मनसेकडून करण्यात आला होता.

गुजराती भाषेतील रेल्वे सूचनांचे पोस्टर लावल्याबद्दल आम्ही पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैनची भेट घेऊन यासंबंधित तक्रार केली आहे. त्यांनी ते पोस्टर काढण्याचे निर्देश आरपीएफ पोलिसांना दिले आहेत.
– चेतन पेडणेकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

First Published on: August 28, 2018 4:00 AM
Exit mobile version