प्रसुतीगृहांमध्ये १२० दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ नाहीच!

प्रसुतीगृहांमध्ये १२० दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ नाहीच!

मुंबई महापालिकेच्या विशेष हॉस्पिटल तसेच प्रसुतीगृहांसह दवाखान्यामध्येही रक्तांसाहित इतर वैद्यकीय निदान चाचण्या करण्यासाठी ‘आपली चिकित्सा’ योजना राबवण्यास मागील फेब्रुवारी महिन्यात मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. परंतु आपली चिकित्साअंतर्गत रुग्णांकडून प्रत्येक चाचणीसाठी अनुक्रमे ५० व १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्या तुलनेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम)अंतर्गत मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याने त्याची सुविधा २९ प्रसुतीगृह आणि महापालिकेच्या १२० दवाखान्यांमध्ये पुरवली जाणार आहेत. त्यामुळे उर्वरीत विशेष हॉस्पिटले, उपनगरीय हॉस्पिटले आणि काही दवाखान्यांमध्येच ‘आपली चिकित्सा’चा लाभ रुग्णांना दिली जाणार आहे.

महापालिकेच्या १६ उपनगरीय हॉस्पिटलांपैकी राजावाडी हॉस्पिटल, कांदिवली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, वांद्रे के.बी. भाभा हॉस्पिटल, गोरेगाव सिद्धार्थ हॉस्पिटल या चार हॉस्टिलांत तिन्ही पाळ्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू आहे. याठिकाणी मूलभूत तपासण्या होत असल्या तरी जटील तपासण्या होत नाहीत. शिवाय १२ हॉस्पिटलांमध्ये एक किंवा दोन पाळांमध्ये प्रयोगशाळा सुरू आहेत. तिथेही जटील तपासण्या होत नाहीत. त्यामुळे यासह विशेष हॉस्पिटलांसह प्रसूतीगृह आणि दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ अंतर्गत अद्ययावत विकृत चिकित्सा चाचणी नि:शुल्क देण्याचा निर्णय सर्वप्रथम प्रशासनाने घेतला होता. यासाठी महापालिकेने रुग्णाकडून मूलभूत नमुना प्रति चाचणीसाठी १०० रुपये शुल्क आणि अतिविशेष चाचणीसाठी २०० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. परंतु स्थायी समितीने उपसूचनेद्वारे हे शुल्क अनुक्रमे ५० व १०० शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु एवढे शुल्क रुग्णांना आकारले जात असले तरी महापालिका कंपनीला अनुक्रमे २२३ आणि ८९२ एवढे शुल्क प्रत्येक चाचणीसाठी प्रयोगशाळांना मोजणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात आपली चिकित्सा योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतरही लोकसभा आचारसंहितेमुळे प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीला विलंब झाला. आचारसंहिता उठल्यानंतर जून महिन्यापासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

सध्या विशेष हॉस्पिटलांमध्ये तसेच काही उपनगरीय हॉस्पिटलांंमध्ये ‘आपली चिकित्सा’ सुरु झाली आहे. तर २८ प्रसुतीगृहांमध्ये ही योजना सुरुच करण्यात आली नसून १२० दवाखाने वगळता उर्वरीत दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ सुरु करण्यात येत आहे. त्यातील १० ते ११ दवाखान्यांमध्ये ‘आपली चिकित्सा’ योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. प्रसुतीगृह वगळता चार विशेष हॉस्पिटलांसह उपनगरीय हॉस्पिटले तसेच काही दवाखान्यांमध्ये या योजनेचा लाभ दिला जात आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरीत ठिकाणी सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: June 18, 2019 5:13 AM
Exit mobile version