आरे वनक्षेत्र : अधिसूचनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

आरे वनक्षेत्र : अधिसूचनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

आरेमधील ८०८ एकर क्षेत्रासाठी भारतीय वन अधिनियमाच्या कलम ४ ची अधिसूचना आज महाराष्ट्र वन विभागाने प्रकाशित केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय वन अधिनियम कलम – ४ च्या अधिसूचनेस मान्यता दिली. मुंबईसारख्या इतर कोणत्याही शहरात एवढ्या मोठ्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा असेल मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया पर्यटन आणि पर्यावरण विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. हे खरोखर एतिहासिक आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सप्टेंबरमध्ये घेण्यात आला आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.

आदिवासींचे हक्क अबाधित

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 लावण्यात येऊन त्यानुसार 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील.त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल. सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. त्याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.


 

First Published on: October 14, 2020 3:26 PM
Exit mobile version