आसाममधील रितादेवीलाही व्हायचेय पुरुष !

महाराष्ट्र पोलीस दलातील ललिता साळवेवर शस्त्रक्रिया करून तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पुरुष बनवण्यात आल्याची माहिती सार्‍या देशभर पसरली. त्यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या भावना मनात दाबून ठेवलेल्या आसाममधील रितादेवी (वय 36) हिच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे तिने सेंट जॉर्ज हॉस्पिटलशी संपर्क साधून आपल्यालाही पुरुष व्हायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यास हॉस्पिटलकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

आसाममधील होजय भागात राहणार्‍या बिहारी सिंग व थोईबी देवी यांची मुलगी रिता देवी अनेक वर्षांपासून स्त्री म्हणून आयुष्य जगत आहे. पण शरीरात होणार्‍या बदलांमुळे तिलाही लिंग परिवर्तन करून पुरुष होण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने आसाममधील डॉ. प्रसनजीत पॉल यांच्याकडे उपचार सुरू केले. परंतु नुकतेच सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ललितावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला ललित बनवल्याची माहिती संपूर्ण देशभर पसरली.

या बातमीची दखल घेत रितावर उपचार करणारे डॉक्टर प्रसनजीत पॉल यांनी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांच्यासशी संपर्क साधला. त्यांना रितादेवीबद्दल माहिती दिली. त्यांच्याकडे शस्त्रक्रिया आणि खर्चाबाबत विचारणा केली. या वेळी डॉ. गायकवाड यांनी त्यांना सविस्तर माहिती देत शस्त्रक्रिया निशुल्क होत असल्याचे सांगितले. त्यामुळे लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसंदर्भातील आवश्यक चाचण्या करण्यासाठी रितादेवी लवकरच मुंबईत येणार आहे, असे डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

हॉस्पिटलकडे लिंग परिवर्तनासाठी ओघ
ललितावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर सेंट जॉर्ज हॉस्पिटलकडे देशभरातून मोठ्या प्रमाणात लिंगपरिवर्तनासंदर्भात विचारणा होऊ लागली आहे. आतापर्यंत 12 जणांनी विचारणा केली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली विचारणा लक्षात घेऊन प्लॉस्टिक सर्जरी विभागाचे डॉ. रजत कपूर यांच्यामार्फत बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबईसह अन्य राज्य आणि विदेशातूनही लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी फोन येत आहेत, असे सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

First Published on: July 24, 2018 6:00 AM
Exit mobile version