मांडवा ते अलिबाग रस्त्याच्या रुंदीकरण कामाला गती द्यावी – उद्धव ठाकरे

मांडवा ते अलिबाग रस्त्याच्या रुंदीकरण कामाला गती द्यावी – उद्धव ठाकरे

cm uddhav thackeray

मांडवा ते अलिबाग या २१ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती द्यावी. सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने या कामात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या उपस्थितीत भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स फेरी सेवेसंदर्भात विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मांडवा जेट्टी येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. मांडवा येथील जेट्टीजवळील अतिक्रमण दूर करावे. वाहनतळाचा विस्तार करावा. स्वच्छतागृहे व प्रथमोपचार आदि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स फेरी सेवा पावसाळ्यातही सुरू राहावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स फेरी सेवा करण्यासंदर्भात यंत्रणेची तयारी व ही सेवा लवकरात लवकर कशी सुरू करता येईल याविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई मेरिटाइम बोर्डाने यावेळी रो-पॅक्स फेरी सेवेसंदर्भात सादरीकरणही केले.


हेही वाचा – कॅगच्या अहवालात उल्लेखित प्रकल्प २०१४ पूर्वीचे : देवेंद्र फडणवीस

मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर रस्तामार्गे गेल्यास १०९ किलोमीटर इतके आहे आणि या प्रवासासाठी सुमारे तीन तास लागतात. परंतु भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स फेरी सेवेद्वारे जलमार्गाने प्रवास केल्यास केवळ पाऊण तासात (४५ मिनिटांमध्ये) भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर पार करता येवू शकणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो-पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत करण्यात आले आहे. केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्यशासनाकडून ५०- ५० टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पेक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे. सुमारे पाचशे प्रवासी आणि १८० वाहने घेऊन जाण्याची या जहाजाची क्षमता आहे.

यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंग, कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामास्वामी एन., कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, रायगडच्या जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी तसेच एस्क्वायेर शिपिंग अँड ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

First Published on: March 4, 2020 5:58 PM
Exit mobile version