मिक्सरची बाईकला धडक लागून तरुणाचा मृत्यू

मिक्सरची बाईकला धडक लागून तरुणाचा मृत्यू

अपघात

मिक्सरची बाईकला धडक लागून अरविंद वाघमारे या 30 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी अपघाताची नोंद करुन आरोपी मिक्सर चालकाला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याची लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात कुर्ला येथील एलबीएस रोड, लायन गार्डनजवळील उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धेश दिगंबर रांजनकर हा वांद्रे येथील खेरनगर, अभ्युदय बँक समोरील एका निवासी इमारतीमध्ये राहतो.

अरविंद वाघमारे हा त्याचा मित्र असून ते दोघेही मंगळवारी सायंकाळी कुर्ला येथून वांद्रेच्या दिशेने येत होते. सायंकाळी पावणेसात वाजता ते दोघेही बाईकवरुन येताना लायन गार्डनच्या उत्तर वाहिनीवर एका मोटार मिक्सरने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. या अपघातात सिद्धेश आणि अरविंद हे दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही पोलिसांनी शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे अरविंदला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सिद्धेशवर उपचार सुरु केले होते. त्याच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी मिक्सरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.

First Published on: November 22, 2019 1:02 AM
Exit mobile version