वाडा-मनोर मार्गावरील अपघातात इसमाचा मृत्यू

वाडा-मनोर मार्गावरील अपघातात इसमाचा मृत्यू

वाडा-मनोर मार्गावरील सापणे फाटा येथे टेम्पो आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात कार चालक प्रवीण खिराडे (वय 45 रा. किरवली) यांचा जागीच मृत्य झाला आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास प्रवीण खिराडे हे आपल्या फियाट कारने वाड्याकडून मनोरच्या दिशेने जात असताना समोरून येणार्‍या टेम्पोला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यात कारचा चक्काचूर झाला. तर टेम्पोचा टायर फुटला. या अपघातात प्रवीण खिराडे यांना जबर दुखापत झाली. वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मनोर मार्गावरील सापणेफाटा येथील वनविभागाच्या हद्दीत असलेल्या अपूर्ण कामामुळे ही जागा जणू मृत्यूचा घाट बनली आहे. आजपर्यंत या जागी 10 ते 12 जणांचा बळी गेला असून हा मार्ग सुप्रीम कंपनीकडे असताना वादाच्या भोवर्‍यात होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या हा रस्ता आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र या मार्गाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचीकडून दुर्लक्ष होत आहे, असा आरोप केला जात आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती बळी घेणार आहे, असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. धोकादायक असलेल्या जागांवर सूचना फलक तसेच सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

First Published on: February 18, 2020 1:57 AM
Exit mobile version