घातक शस्त्रांच्या तस्करीतील आरोपीला तब्बल ३१ वर्षांनी अटक

घातक शस्त्रांच्या तस्करीतील आरोपीला तब्बल ३१ वर्षांनी अटक

घातक शस्त्रांच्या तस्करीतील एका आरोपीस ३१ वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. प्रभाकर ज्ञानेश्वर मटकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला गुरुवारी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दादर येथील एन. सी केळकर मार्गावरील प्लाझा सिनेमागृहाजवळ काही तरुण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर ३ डिसेंबर १९८७ रोजी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून प्रभाकर मटकर याला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली होती.

३१ वर्षापासून आरोपी फरार

घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. जामिनावर बाहेर येताच प्रभाकर हा पळून गेला होता. गेल्या ३१ वर्षांपासून तो पोलिसांना सतत तुरी देत होता. त्याचा शोध सुरु असताना प्रभाकर हा मुरबाड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील महेश पाटणकर, सुरेश साळुंखे, संतोष जाधव यांनी मुरबाड येथून प्रभाकरला शिताफीने अटक केली. तपासात तो प्रभाकर मटकर असल्याचे उघडकीस आले, तो ३१ वर्षांपासून फरार होता, या कालावधीत त्याने इतर काही गुन्हे केले का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

First Published on: April 18, 2019 9:10 PM
Exit mobile version