ओशिवरा नदीतील ६ अतिक्रमणांवर कारवाई

ओशिवरा नदीतील ६ अतिक्रमणांवर कारवाई

ओशिवरा नदीतल्या अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई

ओशिवरा नदी पात्रात असलेल्या ६ व्यवसायिक स्वरुपाच्या अतिक्रमणांवर महापालिकेच्यावतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात आज ६ अतिक्रमणे तोडण्यात आली आहेत. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून असलेली ही अतिक्रमणे तोडल्यामुळे नदी पात्राच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी २३ अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे आहेत. त्यातील ६ अतिक्रमणे मंगळवारी झालेल्या कारवाईत हटविण्यात आली आहेत. उर्वरित १७ पैकी ८ प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत. तर ९ अतिक्रमणे गुरुवारपासून करण्यात येणार्‍या कारवाई दरम्यान हटविण्यात येणार आहेत.

टप्प्याटप्प्याने हटवणार बांधकामं

ही बांधकामं हटवण्यात आल्याने नदीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल. परिणामी, पर्यावरणाचे संवर्धनही काही प्रमाणात साधले जाणार आहेत. ही कारवाई पुढील काही दिवस सुरु राहणार असून टप्पेनिहाय पद्धतीने उर्वरित अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘के / पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत मुंबई पोलीस दलाचे १० पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तर महापालिकेचे १५ कामगार – कर्मचारी – अधिकारी सदर ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच या कारवाईसाठी २ जेसीबी, १ डंपर वापरण्यात आले, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली आहे.

First Published on: August 29, 2019 8:15 AM
Exit mobile version