दहिसर रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, अतिक्रमण हटवले

दहिसर रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, अतिक्रमण हटवले

दहिसर पूर्व येथील भरुचा मार्गाला जोडणार्‍या पद्माकर जावळे मार्गावरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण गुरुवारी महापालिकेच्या आर/उत्तर विभागाच्या वतीने काढण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे काढल्यामुळे जावळे मार्ग मोकळा झाला असून परिणामी स्टेशन मार्ग असलेल्या भरुचा मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आता दूर होणार आहे. त्यामुळे आता दहिसर स्थानकाकडे विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.

दहिसर रेल्वे स्थानकाजवळी पूर्व दिशेला असलेल्या स्थानक समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणे मागील काही महिन्यांपूर्वी हटवून येथील मार्ग रुंद करण्यात आला होता. त्यानंतर या मार्गाला जोडणार्‍या पद्माकर जावळे मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहिम गुरुवारी आर/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली. या कारवाईत स्टेशन रोडशेजारी असलेल्या पद्माकर जावळे मार्गावरील पक्क्या स्वरुपातील सात ते आठ बांधकामे हटवण्यात आली. त्यामुळे स्टेशन परिसरातील रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाल्याने भरुचा मार्गावर आता एकाच दिशेने वाहतूक होऊन त्यांना पद्माकर जावळे मार्गावरुन बाहेर जाता येणार आहे. भरुचा मार्गाचे रुंदीकरण झाल्याने, स्थानकाकडे जाणारी वाहतूक आता सुरळीत होईल, असा विश्वास सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी व्यक्त केली.

First Published on: January 17, 2020 10:37 PM
Exit mobile version