विनाहेल्मेट ४३ हजार दुचाकीस्वारांवर वाहतुक पोलिसांची कारवाई

विनाहेल्मेट ४३ हजार दुचाकीस्वारांवर वाहतुक पोलिसांची कारवाई

दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट विना दुचाकी चालविणे वाहतूक नियमाचे उल्लंघन आहे. चालकाच्या जीविताला धोका आहे. अशा आशयाच्या जनहितार्थ जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च केल्यानंतरही दुचाकी वाहन चालकांमध्ये हेल्मेट घालून वाहन चालविण्याची मानसिकता चालकांमध्ये नसल्याचे वाहतूक विभागाच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईमुळे रोड अपघातात घट झाल्याचा दावा वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केला आहे.

३४ लाख ३८ हजार रुपयांची वसुली

दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट बंधनकारक केल्यानंतर ठाणे वाहतूक विभागाच्या वतीने धडक कारवाई सुरु केली. सातत्याने केलेल्या कारवाईमुळे ठाण्यात विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांच्या मागे ससेमिरा सुरु ठेवला आहे. ठाणे वाहतूक विभागाच्या धडक कारवाईत जानेवारी २०१९ ते आक्टोबर, २०१९ या कालवधीत तब्बल ४३ हजार ११० विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून वाहतूक विभागाने जवळपास ३४ लाख ३८ हजार रुपयांची वसुली केली आहे. सन २०१९ मध्ये करण्यात आलेली कारवाई ही मागील वर्षाच्या तुलनेत चारपट अधिक आहे.

कारवाई सुरु राहिल्यास अपघातांवर नियंत्रण

सन २०१८ जानेवारी ते आक्टोबर, २०१८ या वर्षात वाहतूक विभागाने विनाहेल्मेट केलेल्या कारवाईत ९ हजार १२० दुचाकी चालकांवर कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. दंडात्मक कारवाईच्या सोबत अपघाताच्या घटनांमध्येही १० टक्क्यांनी घट झाली आहे. अशा प्रकारे कारवाईचा ससेमिरा सुरु राहिल्यास दरवर्षी १० टक्क्यांनी घट झाल्यास अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात यश लाभेल असे काळे यांनी सांगितले.

First Published on: November 21, 2019 7:51 PM
Exit mobile version