अंधेरीतील ब्युटी सलूनमध्ये समाजसेवा शाखेची कारवाई

अंधेरीतील ब्युटी सलूनमध्ये समाजसेवा शाखेची कारवाई

सेक्स रॅकेट

 अंधेरीतील एका ब्युटी सलूनमध्ये शुक्रवारी गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांनी कारवाई करुन एका महिलेसह देाघांना अटक केली तर चार महिलांची सुटका केली. या ब्युटी सलूनमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले आहे. अटक आरोपींमध्ये नेहा ऊर्फ जाहिदा आणि बेचन भुपेंद्र राऊत यांचा समावेश असून अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चारही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरीतील एका निवासी अपार्टमेटमध्ये असलेल्या ब्युटी सलूनमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे एका बोगस गिर्‍हाईकाला पाठवून त्याची शहानिशा केली होती. या माहितीत तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर एसीपी तोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तुद, बागडे, सोनावणे, नाईक, सोनावणे, मोरे, पाटील, ताजणे या पोलीस पथकाने अंधेरीतील लोखंडवाला रोडवरील सुरेशनगर, ऑफ चार बंगला, मोहिंद हाईट्स अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर आर2 स्पा अ‍ॅण्ड सलून युनिसेक्स या ब्युटी सलूनमध्ये छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली तर 25 ते 32 वयोगटातील चार महिलांची सुटका केली. या चारही महिलांची मेडीकलनंतर महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे दोन्ही आरोपींना नंतर आंबोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्यांना शनिवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत ब्युटी सलूनच्या मालक-चालकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: February 10, 2019 4:20 AM
Exit mobile version