खुलेआम मद्यपान करणार्‍या तळीरामांना आवरा

खुलेआम मद्यपान करणार्‍या तळीरामांना आवरा

Drink

कामोठे परिसरात बियर शॉपी व देशी दारूच्या दुकानासमोर खुलेआमपणे मद्यपान केले जात असल्यामुळे याठिकाणी रस्त्यांवरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सिटीझन युनिटी फोरमच्या वतीने कामोठे पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कामोठे परिसरामध्ये तब्बल 23 बियर शॉप, 15 परमिट रूम आणि दोन देशी बार आहेत. उत्पादन शुल्क विभाग पनवेल अंतर्गत परवानग्या देण्यात आलेल्या बियर दुकानाच्या एकूण संख्येच्या जवळपास 20 टक्के परवानग्या कामोठे वसाहतीत देण्यात आल्या आहेत. बियर व दारू विक्रीची परवानगी देताना विक्रेत्यांना फक्त विकण्याचा परवाना देण्यात येतो. मात्र, कामोठ्यात सर्रासपणे दुकानांच्या बाहेर व फुटपाथवर उभे राहून तसे मोकळ्या मैदानात व बागांमध्ये उघडपणे लोक मद्यपान करताना दिसत आहेत आणि तिथेच बाटल्या फोडून निघून जातात.

त्यामुळे याचा त्रास लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून कामोठेवासीयांनी कामोठे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास सोनावणे यांना निवेदन दिले आणि जाहीरपणे चालणार्‍या या प्रकारांना पायबंद घालावा, अशी मागणी केली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक सोनावणे यांनी पोलिसांमार्फत मद्यपींवर तसेच हुक्का पार्लर अणि गुटखा विक्रेत्यांवार केलेल्या कारवाईची माहिती दिली. याबाबतचे निवेदन देताना शेकापचे पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्यासह युनिटी फोरमच्या रंजना सडोलीकर तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उघड्यावर मद्यपान करणार्‍या मद्यपींवर कारवाई केली जात आहे. मद्यपींची हयगय केली जाणार नाही.
देवीदास सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे पोलीस ठाणे

First Published on: February 11, 2019 5:33 AM
Exit mobile version