वसईमध्ये गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर

वसईमध्ये गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर

Alcohol

२०१८ हे वर्ष पालघर पोलिसांच्या कारवाईचे वर्ष म्हणून गुन्हेगारी जगतात ओळखले जाईल. या वर्षात रेती, गुटखा, जुगार, दारू, अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला लगाम घालून आपला वचक कायम ठेवला आहे. पालघर जिल्ह्याचा पदभार हाती घेतल्यापासून पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी रेतीचोरी,बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ, जुगार अड्डे, गावठी दारूच्या भट्ट्या, अमली पदार्थ शोधून दररोज कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुन्हेगारांना वचक तर बसलाच त्याचबरोबर शासनाच्या तिजोरीत महसूलही गोळा झाला.

चोरट्या रेती विरोधात पालघर पोलिसांनी वर्षभरात ११६ गुन्हे दाखल करून २३ कोटी ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करतानाच ९६ आरोपींनाही अटक केली. अवैध जुगार-मटका धंद्यावर कारवाई करताना एकूण ७७ गुन्हे दाखल करण्यात आले. दोन कोटी ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि ६२९ आरोपींना अटक करण्यात आली. गुजरातहून मुंबईला नेण्यात येणार्‍या गुटखा वाहतूकप्रकरणी ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात ७३ आरोपींना अटक करण्यात आली. अवैध दारूविक्री रोखून हातभट्ट्या उद्ध्वस्त करताना पोलिसांनी ८९१ गुन्हे दाखल केले. त्यात २ कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४३८ आरोपींना अटक करण्यात आली.

अमली पदार्थांवर गौरव सिंह यांच्या पथकाने एनडीपीएस कायद्यानुसार ७९ गुन्हे दाखल केले. त्यात १३५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोटपा कायद्यांतर्गत १४६५ नुसार केलेल्या कारवाईत ३ लाखांचा अन्य मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या वर्तुळात यंदा २०१८च्या आकडेवारीनुसार पोलिसांनी बाजी मारल्याचे सिद्ध झाले आहे.

First Published on: January 2, 2019 5:18 AM
Exit mobile version