दवाखाना, नर्सिंग होम्स बंद ठेवल्यास महापालिका परवाना रद्द करणार!

दवाखाना, नर्सिंग होम्स बंद ठेवल्यास महापालिका परवाना रद्द करणार!

खासगी दवाखाने व खासगी नर्सिंग होम्स ‘कोरोना कोविड-१९’च्या कालावधी सुरु करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी देवूनही अद्यापही रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. मात्र, बंद असलेल्या दवाखाने व नर्सिंग होमअभावी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता आता या दवाखान्यांसह नर्सिंग होम्सचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. यासर्व दवाखान्यांसह नर्सिंग होम्स तसेच शुश्रुषा होम्सविरोधात ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ (साथरोग कायदा १८९७) नुसार कारवाई करण्यात येणार आहे

‘कोरोना कोविड-१९’ व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी म्हणजेच ‘नॉन कोविड’ उपचारांसाठी मुंबईतील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वीच महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत. परंतु अनेक ठिकाणी अद्याप या सेवा सुरू न झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ‘नॉन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जे खाजगी ‘नर्सिंग होम’, शुश्रुषा गृह, दवाखाने अद्याप सुरू झालेले नसतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बंद असणाऱ्या खाजगी दवाखान्यांबाबत ‘पिडेमिक ॲक्ट १८९७’ (साथरोग कायदा १८९७) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

तसेच जे नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीमध्ये, भाड्याच्या जागेत किंवा तत्सम ठिकाणी असून ते उघडण्यास सोसायटीतील व्यक्ती, मालक, शेजारी इत्यादींच्या माध्यमातून अडथळा आणला जात असल्यास किंवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्यास, अशाप्रकारे दवाखाने उघडण्यास अडथळा आणणाऱ्यांविरोधात ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशान्वये अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे व गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.

खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने यांच्यासाठीची मार्गदर्शक धोरणे

दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे ‘वीना स्पर्श’( नॉन कॉन्ट्रक्ट टेंपरेचर) पद्धतीने तपासावे. त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान ९८.६ फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवावे.

एखाद्या व्यक्तीची लक्षणे ही ‘कोरोना कोविड-१९’ सारखी असल्यास अशा व्यक्तींना महापालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे.

खासगी दवाखान्यांमध्ये ‘नॉन कोविड’ रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे विकार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. तसेच सदर व्यक्ती हे त्यांना सांगण्यात आलेले औषधोपचार योग्यप्रकारे घेत असल्याची खातरजमा करावी.

रुग्णांना तपासताना ‘आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय’ यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन करावे. यामध्ये प्रामुख्याने मुखावरण (मास्क) वापरणे, निर्धारित अंतर ठेवणे (सोशल डिस्टन्सींग), हातांची स्वच्छता राखणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

First Published on: April 25, 2020 3:22 PM
Exit mobile version