निवडणूक काळातही अनधिकृत बांधकामांवर हातोडा

निवडणूक काळातही अनधिकृत बांधकामांवर हातोडा

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिह्यात आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात कारवाया होत नाहीत, असे गृहित धरून ठाण्यातील अनेक भूमाफिया आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकामे करतात, पण आता ठामपा आयुक्तांनी आचारसंहिता काळातही दिव्यासह उर्वरित ठाण्यात अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग दिला आहे. निवडणूक काळातही अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

ठाण्यामध्ये दिवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक बेकायदा बांधकामे होत असतात. मुंब्रा प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी याविरोधात जोरदार मोहीम उघडली. अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आणि भविष्यात ती होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात आली. मात्र, दिव्यातील परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आयुक्तांनी पुन्हा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनाच दिव्यातील अतिक्रमणविरोधी मोहिमेची जबाबदारी दिली आहे. दिवा प्रभागात सध्या 40 हून जास्त बेकायदा इमारती आणि अनेक चाळींची बांधकामे सुरू आहेत. यावर कारवाई करण्यात प्रभारी सहाय्यक आयुक्त महादेव जगताप यांना अपयश आले आहे. त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. मुंब्रा प्रभाग समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना दिवा प्रभागात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या आधीच त्यांना दिव्यातील करवसुली ब्लॉक क्र.162, 170, 171 आणि 173 या भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रभाग समितीतील अतिक्रमण विभागाचे लिपिक चंद्रप्रकाश सोनार यांची बदली डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह विभागात केली आहे. त्यांच्याजागी नाट्यगृहाचे लिपिक राजेंद्र चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे दिव्यातील अनधिकृत बांधकामे निवडणुकीच्या कालावधीतही जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

दिवा प्रभागात अतिक्रमण विरोधी मोहीम हाती येताच सहाय्यक आयुक्त आहेर यांनी दिवा येथील साबे गावातील डीजे कॉम्प्लेक्स येथील कांदळवन हटवून सुनील यादव यांनी अनधिकृतपणे बांधलेल्या 15 रूमचे आरसीसी बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.

First Published on: March 30, 2019 4:02 AM
Exit mobile version