तपासणी न करता डायलिसिस करणाऱ्या केंद्रांवर होणार कारवाई!

डायलिसिस केंद्रांमध्ये सध्या सरसकट डायलिसिस केली जाते. परंतु यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसह सर्वांची एकाच ठिकाणी डायलिसिस केली जात असल्यामुळे आहे. त्यामुळे याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक डायलिसिस केंद्रांमध्ये प्रत्येक रुग्णांची कोविड १९ची पूर्णत: तपासणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अशाप्रकारे तपासणी न करता रुग्णांवर थेट डायलिसिस करणाऱ्या केंद्रांविरोधात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

कि‍डनी आजार असणाऱ्या रुग्‍णांना नियमितपणे डायलिसिस केंद्रांत जाऊन डायलिसिस करावे लागते. मुंबईत डायलिसिस घेणाऱ्या रुग्‍णांची संख्‍या ही लक्षणीय आहे. परंतु मुंबईतील काही  डायलिसिस केंद्रांमध्‍ये ‘कोविड-१९’ ची लक्ष्‍ाणे असणाऱ्या रुग्‍णांचेही डायलिसिस करण्‍यात आल्‍याच्‍या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्‍या आहेत. यामुळे ‘कोविड-१९’ चा संसर्ग झालेल्‍या व्‍यक्तिंमध्‍ये वाढ झालेली निदर्शनास आली आहे. याचा विचार करत अशा केंद्रांमध्‍ये डायलिसिस  करण्‍यापूर्वी ‘कोविड-१९’ ची  पूर्ण तपासणी करणे बंधनकारक करण्‍यात आले आहे. असे न करणाऱ्या  डायलिसिस केंद्रांविरुद्ध कारवाई करण्‍याचे निर्देश पालिका प्रशासनाने सर्व संबंधितांना दिले आहेत.

‘कोविड-१९’ ची लक्षणे आढळल्‍यास अशा डायलिसिस केंद्रांनी एकतर ‘कोविड-१९’ रुग्‍णांसाठी डायलेसिसची स्‍वतंत्र व्यवस्‍था करावी. अथवा महापालिकेच्यावतीने  कोविड-१९ संबंधी विशेष सुरु केलेल्‍या कस्‍तुरबा रुग्‍णालय, केईएम रुग्‍णालय, सैफी रुग्‍णालय, सेव्‍हन हिल्स रुग्‍णालय आणि नानावटी रुग्‍णालय या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी सूचित करावे,असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच  डायलिसिस पूर्ण झाल्‍यानंतर त्या रुग्‍णांना पूर्वीच्‍याच डायलेसिस केंद्रांकडे उपचार घेण्यासाठी पाठवावे,अशाही सूचना केल्या आहेत.

बंद रुग्णालयातील डायलिसिस रुग्णांचे हाल

मुंबईतील वोक्हार्ट, भाटीय आदी कोरोना रुग्ण आढळून आल्याने बंद करण्यात आलेल्या रुग्णालयातील डायलिसिस रुग्णांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. ही रुग्णालये बंद पडल्यामुळे येथील डायलिसिस केंद्रात उपचार घेणाऱ्या किडनी आजारांच्या रुग्णांना सध्या कोणत्याही रुग्णालयातील डायलिसिस केंद्रात प्रवेश दिला जात नाही. सध्या या सर्व केंद्रांमध्ये विद्यमान रुग्णांवरच उपचार केले जात आहे.  त्यामुळे वोक्हार्टसारख्या रुग्णालयातील डायलिसिस केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर डायलिसिस करण्यासाठी कोणीही तयार होत नसल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून वोक्हार्ट रुग्णालयातील डायलिसिस उपचार घेणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला कोणीही प्रवेश  दिला नाही. असे झाले तरी अशा रुग्णांचे मोठे हाल होतील,अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाऊल उचलावे,अशी विनंती केली आहे.

First Published on: April 15, 2020 10:29 PM
Exit mobile version