रेल्वेलगतच्या झोपड्यांवर लवकरच होणार कारवाई

रेल्वेलगतच्या झोपड्यांवर लवकरच होणार कारवाई

रेल्वेलगतच्या झोपड्या

मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे रुळालगत ७ हजार ८२५ बेकायदा झोपड्या असल्याचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केली होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे मान्य केले. तसेच लवकरच रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मध्य रेल्वेच्या हद्दीत ३१ ठिकाणी, तर पश्चिम रेल्वेवर १७ ठिकाणी बेकायदा झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर ५ हजार ७८४, तर पश्चिम रेल्वेवर १ हजार ९५२ झोपड्या अशा तब्बल सात हजार ८२५ बेकायदा झोपड्या रेल्वे मार्गालगत आहेत. यासंदर्भात १० नोव्हेंबर २०१८ रोजी दैनिक आपलं महानगर’ने “रेल्वे रुळालगत ७८२५ बेकायदा झोपड्या” या मथळ्या खालील वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार हे मुंबई दौर्‍यावर असताना त्यांनी शुक्रवारी पश्चिम रेल्वेतील चर्चगेट मुख्यालयात पत्रकार परिषदेत मुंबईतील रेल्वे लगतच्या ७, ८२५ बेकायदा झोपड्या ही रेल्वे सुरक्षेसाठी गंभीर समस्या आहे.

या बेकायदा बांधकामावर रेल्वेकडून नेहमी कारवाई केली जात असते. नुकतेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे हद्दीत असलेल्या ७०० बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली. त्याच प्रमाणे मुंबईतील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी लवकरच स्थानिक प्रशासनासोबत धडक मोहीम आखण्यात येईल, मध्य रेल्वेने मागील दीड वर्षात १८०० बेकायदेशीर बांधकावर कारवाई केली आहे, असे सांगितले.

मुंबई विभागातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या बेकायदेशीर झोपड्या रेल्वे सुरक्षाच्या दुष्टिकोनातून गंभीर समस्या आहे. आम्ही या बेकायदेशीर झोपड्यांवर नेहमीच कारवाई केली आहे. यापुढेही अशा बेकायदेशीर बांधकामांवर पूर्ण अंकुश लावण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाला हाती घेऊन मोहीम राबवणार आहे.
– अरुण कुमार, महासंचालक, रेल्वे सुरक्षा दल

First Published on: November 17, 2018 5:26 AM
Exit mobile version