तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्याला अटक

तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंद होताच अभिनेता-निर्माता असलेल्या भुपेंद्रसिंग गजेंद्रसिंग यादव या 34 वर्षीय आरोपीस मंगळवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 29 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भुपेंद्रसिंग हा मूळचा उत्तर प्रदेशच्या कानपूर, रामादेवी, बंगाली कॉलनीचा रहिवाशी आहे. सध्या तो अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मेघदूत टॉवर्सच्या आठव्या मजल्यावरील ए/801-802 मध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार 25 वर्षांची तरुणी ही जोगेश्वरी येथे राहते. तिचा भुपेंद्रसिंग हा मित्र असून ते दोघेही गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये त्याच्या घरी राहत होते. ही तरुणी कानूपर शहरात शिकत असताना तिला तिच्या मित्राने भुपेंद्रसिंगविषयी माहिती देताना तिला कधीही काही गरज लागल्यास तो मदत करेल असे सांगितले होते. सहा वर्षांपूर्वी ती अ‍ॅक्टिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली होती. यावेळी तिची भेट भुपेंद्रसिंगशी झाली. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. इतकेच नव्हे तर त्याच्या आईशी तिची ओळख करुन दिली होती.

काही दिवसानंतर ती पुन्हा कानपूरला गेली होती. यावेळी तो तिला घेऊन पुन्हा मुंबईत घेऊन आला. त्यानंतर ती त्याच्यासोबत त्याच्या राहत्या घरी राहत होती. याच दरम्यान त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. लग्नाचे आमिष दाखवून तो सतत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता, मात्र लग्नाविषयी विचारणा केल्यानंतर तो ती दुसर्‍या धर्माशी असल्याने घरातील लोकांना अजून काही वेळ द्यावा लागेल असे सांगून टोलवाटोलवी करीत होता.

First Published on: February 27, 2020 2:02 AM
Exit mobile version