खड्डे अपघातातील आदितीला भाटिया रुग्णालयातून डिस्चार्ज

खड्डे अपघातातील आदितीला भाटिया रुग्णालयातून डिस्चार्ज

आदिती काडगे

ताडदेव पोलीस स्थानकाबाहेर खड्ड्यांमुळे स्कूटरवरुन पडून जखमी झालेल्या आदिती काडगेला अखेर भाटिया रुग्णालयातून सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आदितीची प्रकृती आता स्थिर असून तिला रुग्णालयात ठेवण्याची गरज नसल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय, आता आदिती आपल्या नातेवाईकांना ओळखतेय. त्यामुळे तिला फक्त आरामाची गरज असल्याचं भाटिया रुग्णालयाचे सीईओ डॉ.राजीव बोधणकर यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं ?

बुधवारी ताडदेव पोलीस स्थानकाबाहेरील खड्ड्यांमुळे स्कूटरवरून पडून जखमी झालेल्या आदिती काडगे (३५) यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर त्या ब्रेन हेमरेज स्थितीत होत्या. ग्रँटरोडच्या भाटिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपघातात आदितीच्या डोक्याच्या डाव्या भागामध्ये गंभीर दुखापत झाली. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला जबर मार लागला. शिवाय, थोड्या प्रमाणात अपघातात डोक्याच्या उजव्या बाजूला, डोळ्याजवळ आणि उजव्या हाताच्या कोपरालाही मार लागला होता. आदिती ताडदेवमधील फॉरजेट रस्ता येथे राहत असून बुधवारी त्या पोलीस स्थानकाकडे स्कूटरवरून जात होत्या. पोलीस स्थानकाजवळील मोठ्या खड्ड्यांमध्ये तोल जाऊन त्या खाली पडल्या. अपघातानंतर ताडदेव पोलिसांनी त्यांना तात्काळ नायर रुग्णालयामध्ये दाखल केलं. पण, पुढील उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लगेचच भाटिया रुग्णालयामध्ये नेलं होतं.

शस्त्रक्रियेची गरज नाही 

भाटिया रुग्णालयाचे सीईओ डॉ. राजीव बोधणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती यांच्यावर कसल्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची गरज नाही. त्यांच्या सिटीस्कॅन रिपोर्टनुसार त्यांच्यावर ‌शस्त्रेक्रियेची गरज नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय, आता त्यांची प्रकृती हळूहळू स्थिर होईल. औषधं आणि आरामाने त्यांना बरं वाटेल. तिला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच, आतापर्यंत झालेल्या खर्चात २५ टक्के मदत ही भाटिया रुग्णालयातून करण्यात आली आहे. आदितीचे पती निलेश कडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तिची प्रकृती थोडी स्थिर आहे. पण, अजूनही ती पूर्णपणे शुद्धीत आलेली नाही. ती उपचारांना प्रतिसाद देतेय. तिला बरं वाटायला आणखी थोडा वेळ जाईल असं ही सांगण्यात आलं आहे.

First Published on: July 24, 2018 6:07 PM
Exit mobile version