रस्त्यांची कामे ठप्प, मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी; आदित्य ठाकरेंची मागणी

रस्त्यांची कामे ठप्प, मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी; आदित्य ठाकरेंची मागणी

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः मुंबईसह राज्यभरात रस्त्यांची कामे गेल्या दोन आठवड्यापासून बंद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, शिंदे सरकारकडून मुंबईतील रस्त्यांच्या क्रॉकिटीकरणामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे सीएम म्हणजे corrupt man अशीच ओळख तयार झाली आहे. मुंबईत गोखले पूलाचे आणि डिलाईरोडला काम सुरु आहे. ही कामे गेल्या दोन आठवड्यांपासून ठप्प आहेत. या कामांना महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने आणि काही पर्यावरण संस्थांनी नोटीस बजावली आहे. लोकप्रतिनिधी नसताना रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत. या कामांसाठी अतिरिक्त पैसे मोजण्यात आले आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू महापालिकेत नगरसेवक होते. त्यांनीही पत्र लिहिले आहे की रस्त्यांची कामे ठप्प आहेत. याचा अर्थ केवळ आमचेच नाही तर भाजपसह अन्य पक्षाचे नगरसेवकही रस्त्यांच्या कामांमुळे त्रस्त आहेत. तसेच रस्त्यांच्या कामांसाठी खडी मिळत नाही. एकाचकडून खडी खरेदी करण्याचा आग्रह धरला जात आहेत. केवळ काही कंत्राटरादांना खडी मिळत आहे. हे नेमके कशासाठी सुरु आहे. कोणासाठी सुरु आहे, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, माझे केंद्र सरकार आणि मंत्री नितीन गडकरी यांनाही आवाहन आहे की त्यांनीही याची चौकशी करावी. रस्त्यांची कामे का बंद आहेत याचा आढावा घ्यावा. कारण विकासाच्या नावाखाली भाजप राजकरण करत आहेत. मग मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारख्या भ्रष्ट माणसांना पाठिंबा का दिला जातोय.

रस्त्यांची कामे का ठप्प आहेत. कामे करण्यासाठी खडी का मिळत नाही. रस्त्यांच्या कामासाठी अतिरिक्त पैसे का दिले गेले आहेत, याचा खुलासाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

First Published on: April 19, 2023 2:17 PM
Exit mobile version