आदित्य ठाकरेंकडून पुन्हा शिक्षण मंत्री लक्ष्य

आदित्य ठाकरेंकडून पुन्हा शिक्षण मंत्री लक्ष्य

Vinod Tawde

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याची सूचना केल्यानंतर त्यावरुन सुरु झालेल्या वादावर आदित्य ठाकरेंनी ट्विटवरुन जोरदार हल्लाबोल चढवित तावडेंवर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडले आहे. आजच्या युवा पिढींनी फक्त मतदानासाठी मतदान केंद्रात जावे, त्यांनी शिक्षण आणि नोकरीवर प्रश्न विचारु नये, अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली आहे. आदित्य ठाकरेंच्या या ट्विटनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तावडेंविरोधात आंदोलन छेडल्याने राजकीय वातावरणही तापू लागले आहे. दरम्यान, अमरावतीतील हा प्रकार खोटा असल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयातून करण्यात आला आहे.

अमरावती येथे एका कार्यक्रम प्रसंगी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रश्न विचारल्यानंतर एका विद्यार्थ्याने व्हिडिओ शूटिंग सुरु केली होती. या व्हिडिओ शूटिंगला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोध केला. त्यानंतरही त्यांनी व्हिडिओ शूटिंग सुरु ठेवल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पोलिसांकडे तक्रार केल्याने पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. यावरुन सध्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. नेमकं हाच मुद्दा धरत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. या अगोदरही आदित्य ठाकरे यांनी तावडेंविरोधात अनेकवेळा टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्विट केल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याचे चित्र राज्यभर सर्वत्र दिसून आले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने हे वाचले पाहिजे, महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्याने त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना व्हिडिओ शूटिंग सुरु केल्याने त्याला अटक करण्यात आली. युवा मंडळी त्यांना फक्त मतदान केंद्रात हवे आहेत. पण त्यांनी शिक्षण आणि नोकर्‍यांवर प्रश्न विचारणे त्यांना नकोय, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर युवा सैनिकांनी तावडेंविरोधात पुन्हा पोस्टरबाजी देखील सुरु केली आहे. तर अकोल्यात युवा सैनिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी तावडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण गंभीर झाले होते.

कपिल पाटील यांचे तावडेंना पत्र
युवा सेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना खुले पत्र लिहीत टीकेची झोड उठविली आहे. त्यात व्यथित अंतःकरणाने हे पत्र लिहीतो आहे. शिक्षकांच्या छळाचा दुसरा अध्याय सुरू झाला असतानाच अमरावतीच्या विद्यार्थ्याला थेट अटक करण्याचे आदेश आपण दिल्याचे लोकमतच्या पहिल्या पानावर वाचले. त्या मुलाचा काय गुन्हा होता? गरीबा घरचा पोरगा. त्याने प्रश्न विचारला होता,‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करुन देईल का?’अशा आशयाचे पत्र यावेळी लिहीले असल्याने पाटील-तावडे पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

First Published on: January 6, 2019 5:09 AM
Exit mobile version